फलटण : फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघानी नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या अन्नछत्रास सुमारे 10 हजार रुपये किंमतीचे किराणा मालाचे 13 किट्स देवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. हे किट्स महाराजा मंगल कार्यालय येथे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे संपादक संघाचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, अध्यक्ष विशाल शहा यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी संपादक संघाचे उपाध्यक्ष बापूराव जगताप, अॅड.रोहित अहिवळे, रोहित वाकडे, मयुर देशपांडे, प्रसन्न रुद्रभटे, भारद्वाज बेडकिहाळ उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक घटकांचा दररोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांसाठी फलटण नगरपालिकेच्यावतीने अन्न शिजवून गरजूंना वाटप करण्याचे कार्य महाराजा मंगल कार्यालय येथून सुरु आहे. या ठिकाणी धान्य, भाजीपाला, किराणामाल आदी वस्तूंची मदत करण्याचे आवाहन फलटण नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाकडून पदाधिकारी व सदस्यांच्या आर्थिक योगदानातून ही छोटीसी मदत करण्यात आली असल्याचे यावेळी विशाल शहा यांनी सांगितले.
वृत्तपत्र संपादकांच्या या उपक्रमाबद्दल मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सर्वांना धन्यवाद देवून या आपद्प्रसंगी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी गरजूंना सढळ हातांनी मदत करावी. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले.
फोटो कॅप्शन : मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे मदत सुपुर्द करताना रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, विशाल शहा, बापूराव जगताप, अॅड.रोहित अहिवळे, मयुर देशपांडे, रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ.