बारामती : वार्ताहर लॉकडाऊन च्या काळात शेतकरी व दुध उत्पादक यांचे नुकसान होऊ नये या साठी दूध संकलन मोठ्या क्षमतेने चालू राहणार असल्याचे बारामती एमआयडीसी मधील रियल डेअरी व फॉर्च्यून डेअरी, इंदापूर चे चेअरमन मनोज तुपे यांनी सांगितले.
आज सबंध जग ‘कोरोना व्हायरस’ मुळे ठप्प झाले आहे, कोणत्याही प्रकारची उलाढाल किंवा व्यापार-उदीम, दळणवळण सध्या पूर्णपणे बंद आहे.दूध व्यवसाय अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असला तरी अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व शेतकरी आणि दूध व्यावसायिकांकडून दूध संकलन करून त्यापासून उप-पदार्थ ची (पावडर, मिल्क कंडेन्स, तुप, बटर, चीज इ..) निर्मिती करतो हेच काम मोठ्या जिकिरीचे बनले आहे. तसेच बनवलेल्या उप-पदार्थांना बाजारपेठे मधून अजिबात उठाव नसल्यामुळे दूध संघांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अशा पार्श्वभूमीवर काही संघ अतिरिक्त दुधावर पर्याय म्हणून ५ ते ६ दिवसांच्या नंतर १ किंवा २ दिवसाचे संकलन बंद ठेवत आहेत. तसेच काही बाहेरील राज्यांमधील दूध संघ ‘बंद’ करून निघून गेलेले आहेत.
त्यामुळे शेतकरी बांधवांना, दूध उत्पादकांना आणि दूध संकलन केंद्रांना खूप मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे, त्यांच्या व्यवसायाची आणि प्रापंचिक स्थितीची वाताहात होत आहे,
अशाप्रकारे दूध संकलन बंद करण्याचा प्रकार वारंवार होत राहिल्यास ग्रामीण भागातील शेतकरी बांधव उध्वस्त होईल ही भीती निर्माण झाली आहे. ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ या उक्तीप्रमाणे कार्य करण्याचे ठरविल्याने रियल डेअरी आणि फॉर्च्यून डेअरी मार्फत “एकही दिवस बंद न ठेवता, कायमस्वरूपी आणि अखंडपणे दूध संकलन करणार आहे.”
त्याच बरोबर ज्यांना नव्याने आमच्या रिअल डेअरी परिवारामध्ये सहभागी व्हायचे आहे, अशांचे आम्ही स्वागतच आहे येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये इंदापूर एमआयडीसी मधील “फॉर्च्यून डेअरी” पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून, आम्हाला आणखी दररोज ५ ते ६ लाख लिटर दुधाची आवश्यकता आहे.
परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक आणि दूध संकलन केंद्रानी आपले निर्भेळ, स्वच्छ, आणि दर्जेदार दूध देऊन सहकार्य करण्याचे आव्हान मनोज तुपे यांनी केले आहे .