बारामती: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांचे मार्फत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रीकल्चर मार्केटिंग जयपूर, राजस्थान येथे सेंद्रिय शेती व विपणन या विषयावर प्रशिक्षण दिनांक 29 फेब्रुवारी ते 6 मार्च 2020 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले होते. या प्रशिक्षणासाठी परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत स्थापन झालेल्या सेंद्रिय शेती गटाच्या प्रमुखांची निवड करण्यात आली होती.
सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सद्यस्थितीला उत्पादित सेंद्रिय शेतीमाल विक्री बाबत समस्या असून स्वतंत्र सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. उत्पादित शेतीमालास चांगला भाव मिळून शेतकऱ्यास जास्तीत जास्त नफा कसा मिळवण्यात येईल यासाठी सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षण कालावधीमध्ये शेतीमाल विक्रीबाबत धोरण, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण पद्धती, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना व फायदे, ग्राहक मूल्य व्यवस्थापन कौशल्य, शेतीमाल निर्यात संधी व संभाव्य धोके इत्यादी विषयांवर तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले तसेच जयपूर येथील सेंद्रिय शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतीस व बाजारपेठेस भेट देण्यात आली.
या प्रशिक्षणाचे आयोजन आत्मा पुणे चे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, प्रकल्प उपसंचालक सुभाष घाडगे, पुनम खटावकर यांचे मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसाद राऊत, दिनेश सावंत यांनी केले होते.