आसू : अर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर असावे यासाठी शासन विविध घरकुल योजना राबविते परंतु बहुतांश लाभार्थी यांचेकडे स्वमालकीच्या जागेची उपलब्धता नसते.जमिनीची एक दीड गुंठा जागा खरेदी करावी तर तुकडा बंदी नियम आड येतो.अशा परिस्थितीत पात्र लाभार्थी यांना हक्काचे घर मिळणे दुरापास्त झाले होते मात्र गोखळी ता.फलटण ग्रामपंचायतीने तुकडा बंदी नियमातील शिथीलतेसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून लाभीर्थींना घरकुल देण्याची किमया साधली असून आता हा गोखळी पटर्न जिल्हयाला मार्गदर्शक ठरणार आहे.
गोखळी ता. फलटण येथील ग्रामपंचायतीमध्ये २०१७ पासून अनेकांकडे स्वमालकीची जागा नसल्याने घरकुलाची कामे रखडली होती. तुकडा बंदी कायद्यामुळे एक दीड गुंठे जागा खरेदी करता येत नसल्यामुळे त्यांना स्वमालकीची जागा मिळेनाशी झाली होती परिणामी घरकुल मंजूर असूनही लाभार्थींना घरकुल बांधता येत नव्हते.अशा परिस्थितीत तुकडा बंदीच्या नियमात शिथिलता मिळाली तर अनेक गरजूंना घरकुलाचा लाभ मिळेल यासाठी गोखळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, सरपंच सुमनताई गावडे, उपसरपंच बाळासाहेब आटोळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविस्तार अधिकारी गणेश दडस यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले आहे.
या प्रकरणी गटविकास अधिकारी अमिता गावडे व विस्तार अधिकारी बाळासाहेब जाधव यांनी सकारात्मक प्रयत्न केले तर प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी घरकुलासाठी तुकड़ा बंदी कायदयातील जाचक अटी शिथील करून घरकुल पात्र लाभार्थींना गुंठेवारी दस्त करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार दि. १३ जानेवारी रोजी गोखळी गावातील काही पात्र लाभार्थ्यींनी दस्त केले असून ग्रामपंचीयतीने तात्काळ लाभीर्थींना घरकुल बांधण्यास परवानगी देण्याने आता त्यांना हक्काचे घर मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लाभार्थींमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी सर्व पदाधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत. आता या गोखळी पॉटर्नमुळे राज्यभर तुकडा बंदी कायदयाच्या जाचक अटीतील शिथिलतेमुळे लाभार्थींना घरकुल मिळणार आहे हे निश्चित झाले आहे.
याबद्दल विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी गोखळीच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
सन २०१७ पासून रखडलेल्या घरकुलासाठी गावातील ज्येष्ट पदाधिकारी, सर्व सदस्य यांच्याबरोबरच गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी यांचे सहकार्य लाभले त्यामुळे लाभार्थींना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता त्यांना हक्काचे घर मिळेल याचा आनंद होत असल्याचे गोखळी ग्रामपंचायत सरपंच सुमनताई गावडे यांनी सांगितले.
गोखळी गावातील ज्येष्ट पदाधिकारी, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून घरकुलासाठीच्या अडचणी दूर केल्या त्यामुळे आम्हाला हक्काचे घर मिळाले असल्याचे लाभार्थी संजय जाधव यांनी सांगून सर्वाचे आभार मानले.