मसाप’च्या ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

फलटण दि. 9 : राष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेच्यावतीने ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम प्रतिवर्षी राबवला जात असून उपक्रमांतर्गत इयत्ता 12 वी च्या मराठी विषय पाठ्यपुस्तकातील ‘सोयरा वृक्षवल्लीचा’ या पाठाचे लेखक अविनाश हळबे यांनी फलटण तालुक्यातील तीन शाळांना भेटी देवून पाठाची संकल्पना, उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण एज्युकेशन सोसायटीचे मालोजीराजे शेती विद्यालय व तिरकवाडी येथील जयभवानी हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमास मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ, फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, कार्यवाह ताराचंद्र आवळे, यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे पर्यवेक्षक थोरात, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य व्ही.पी.हंकारे, उपप्राचार्य शिंदे, प्राचार्य सुभाष देशपांडे, सौ.मोरे, तिरकवाडी हायस्कूलचे प्राचार्य अशोक गुंजवटे यांची उपस्थिती होती. 
इयत्ता 12 वी च्या मराठी विषय पाठ्यपुस्तकातील ‘सोयरा वृक्षवल्लीचा हा पाठ ‘नारायणी नमोस्तुते’ या कथासंग्रहातील असून या पाठाच्या माध्यमातून पर्यावरण मानवी समस्या व सकारात्मक दृष्टीकोन ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे लेखक अविनाश हळबे यांनी सांगितले. 
पर्यावरण संकल्पना, वायुमंडळ, ओझोनच्या थराचे कार्य सविस्तरपणे मांडून पूर्वी मानवाचा पंचमहाभुतांशी घनिष्ट संबंध असल्याचे सांगून सध्या पर्यावरणाचे संतुलन मानवामुळे बिघडले आहे. निसर्गातील वनस्पती, जीवजंतु हे माणसाचे गुरु असून निसर्ग माणसाला भरभरुन देतो. त्यामुळे निसर्गावर प्रेम करणार्‍या माणसाची ही कथा असल्याचे अविनाश हळबे यांनी पटवून देताना पाठांचे कथात्मक सादरीकरण केले.
कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या तिनही विद्यालयांनी सदरच्या उपक्रमाबद्दल मसाप फलटण शाखेचे कौतुक केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!