फलटण दि. १ : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या 54 व्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 54 हजार बाटल्या रक्त संकलित करण्यात येणार आहे. दि. 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत रक्तदान संकलन यज्ञ सुरु राहणार असून भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे बुधवार दि. २ आॅक्टोंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून भाविक भक्त व नागरिक यांनी रक्तदान करुन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आओ संकल्प करे, हम रक्तदान करे हे घोषवाक्य घेवून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यात करण्यात आले आहे. आगामी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे दरवर्षी दि. 21 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येत असलेला जन्मोत्सव व वारीउत्सव यावर्षी दि. 31 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा जन्मोत्सव दरवर्षी विविध सेवाभावी व धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताची टंचाई लक्षात घेऊन जगद्गुरुं यांच्या वाढदिवसांपासून दरवर्षी रक्तदान महायज्ञ आयोजित केला जातो. या उपक्रमाचे माध्यमातून हजारो बाटल्या रक्त संकलित करुन शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाते. एकाचवेळी मोठया प्रमाणात रक्त संकलन करण्याचा संस्थानने विक्रम केला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
जगद्गुरुं यांचा भक्त परिवार महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा यासह देशातील अनेक राज्यांत आहे. भक्त रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. गतवर्षी 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एका दिवसात 31 हजार बाटल्या रक्त संकलित करण्यात आले असल्याचे पत्रकात सांगण्यात आले आहे.
यावर्षी दि. 1 ते 15 ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यात रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून महाराज यांच्या 54 व्या जन्मदिवसानिमित्त 54 हजार बाटल्या रक्त संकलनाचा संकल्प सोडण्यात आला आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांत 665 रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार असून स्थानिक शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स शिबीरामध्ये उपस्थित राहून मदत व माहिती देणार आहेत. संकलित केलेले रक्त तेथे उपलब्ध असलेल्या शासकीय रक्तपेढयामध्ये
ठेवण्यात येणार असून रुग्ण यांची मागणी व गरजेनुसार अत्यावश्यक रुग्णांसाठी त्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रक्तदान शिबिरांसाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली असून महाराज यांचे भक्त व भाविक या उपक्रमामध्ये सहभागी होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
रक्तदान महायज्ञनिमित्त सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील 38 ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून सातारा जिल्हयात 9 ठिकाणी, सांगली जिल्हयात 10 ठिकाणी आणि कोल्हापूर जिल्हयात 19 ठिकाणी रक्तदान शिबिरे होणार आहेत. महाराज यांच्या भाविक भक्त परिवारातील व्यक्ती व रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदानाचे पवित्र कार्य करावे. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ९६१९१७१००४ यावर संपर्क साधावा असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने शेवटी पत्रकात करण्यात आले आहे.