फलटण दि. 26 : श्री ब्रह्मविद्या पाठशाळा महानुभाव आश्रम तरडगांव ता. फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेचे आयोजन रविवार दि. 29 सप्टेंबर ते मंगळवार दि. 8 आॅक्टोंबर पर्यंत करण्यात आल्याची माहिती संयोजक श्री ब्रह्मविद्या ज्ञानचिंतन समिती यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेचा शुभारंभ रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असून समारोप मंगळवार दि.8 आॅक्टोंबर रोजी होणार आहे.
कै.आचार्या तपोनिधी गुरुमाऊली माई कपाटे यांच्या प्रेरणेने व तरडगांव महानुभाव आश्रम संस्थेचे संचालक आचार्य गुरुवर्य श्री प. पू. महंत राहेरकर महानुभाव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असून हे 10 वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेची दशकपूर्तीकडे वाटचाल यशस्वीरित्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.
श्री ब्रह्मविद्या पाठशाळा महानुभाव आश्रम संस्थेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चार्तुमासाच्या कालखंडातील उत्तरार्ध काळात श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला ज्ञानरुप विचारांचं विशेष पर्व श्री ब्रह्मविद्या ज्ञानचिंतन समितीद्वारा करण्यात येते. व्याख्यानमालेचे एकुण 10 सत्र संपन्न होत असून स्मृतीस्थळ,लिळाचरित्र, श्रीमद्भगवद्गीता, सप्त ग्रंथ अश्या विविध ग्रंथाद्वारे महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करताना व्याख्यानमालेच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून यावर्षी श्रीकृष्ण चरित्र या ग्रंथावर आधारित विषयांवर आश्रमातील साधक, साध्वी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व्याख्यानाद्वारे विचारसेवा सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.
नियोजित विषयांवर व्याख्याने सादर होत असताना प्रत्येक विषयांवर आचार्य श्री गुरुवर्य गुरुजी यांचे मार्गदर्शनरुप प्रबोधन संपन्न होणार असून उपस्थित श्रोत्यांसह साधकांना श्री गुरुवर्यांच्या अमृतवाणीतील ज्ञानामृताची नवसंजीवनी व्याख्यानमालेच्या निमित्ताने उपलब्ध होणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेच्या आधारे सर्वसमावेशक विचारातून महानुभाव पंथासाठी एक उत्तम अष्टपैलू व्याख्याता घडावा, सक्षम व स्वयंपूर्ण व्याख्याता घडवत असताना विचारांची परिपक्वता तयार होऊन पंथासह समाजसेवेसाठी सर्वात्तम साधक विद्यार्थी व्यासापीठावर उभा रहावा हाच एकमेव उद्देश या व्याख्यानमालेचा असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
आजपर्यंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून आश्रमातील अनेक साधक विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले असून अनेक साधक प्रबोधनाद्वारे संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. व्याख्यानमाला ही साधकांच्यासाठी एक प्रशिक्षणरुप व्यासपीठ उपलब्ध होत असून श्री ब्रह्मविद्या ज्ञानचिंतन समितीने आयोजित केलेली व्याख्यानमाला समाजाला विचारांचे दान देणारी ठरली आहे.
श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेचा लाभ भाविक भक्त साधक साध्वी संत महंत सदभक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री ब्रह्मविद्या ज्ञानचिंतन समितीचे वतीने करण्यात आले आहे.