फलटण दि. 26 : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना कलाविष्कार विभागातून तयार करुन महाविद्यालयीन कलाकार यांना जिल्हा व मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठस्तरावर उत्कृष्ट कलाकारांचे मार्गदर्शन मिळते. ज्यांच्याकडे विविध कलागुण आहेत त्यांना प्रोत्साहन देवून गुणी आणि होतकरू महाविद्यालयीन कलाकारांनी आपल्या कलेच्या सादरीकरणातून विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास समितीचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 39 व्या मध्यवर्ती युवा महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गुरव बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वासराव देशमुख होते. यावेळी शिवाजी विद्यापीठ संयोजन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. एम. एल. होलगेकर आजरा, श्रीमती सुलक्षणा कुलकर्णी कडेगाव, सी. यु. माने पाटण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोकशेठ दोशी, गव्हनिंग कौन्सिलचे उपाध्यक्ष रमणलाल दोशी, नितीन गांधी, प्रभारी प्राचार्य अरुण गायकवाड, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, कलाकार समीर मोहिते, धोंडिबा कारंडे, महेश जाधव, प्रा. डॉ. सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवाजी विद्यापीठ आयोजित 39 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवांमध्ये 34 कालाप्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये जिल्हास्तरावरील प्रथम तीन क्रमांक व 18 स्पर्धकांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महोत्सवांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आल्याचे डॉ. गुरव यांनी निदर्शनास आणून दिले.
मध्यवर्ती युवा महोत्सवांमध्ये विद्यार्थ्यांना कला दाखवण्याची संधी विद्यापीठस्तरावर मिळत असल्याने स्पर्धेमध्ये खुपच रंगत येत असते. ग्रामीण भागातील युवा कलाकारांनी आपले सादरीकरण चांगल्याप्रकारे केले असून विद्यापीठ या कलाकारांना संधी उपलब्ध करून देते. प्रत्येकाकडे वेगवेगळी क्षमता असते. महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करुन दाखविण्यासाठी युवा महोत्सव ही एक संधी असल्याचे डॉ. गुरव यांनी सांगितले .
वार्याच्या वेगाने सळसळणारे रक्त महाविद्यालय युवा कलाकारांमध्ये असून त्यांना संधी देण्यासाठी या जिल्हास्तरीय व मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या विषयाबाबत कलेबाबत क्षमता असते. अभ्यासात मागे असणारे विद्यार्थी आज दूरदर्शन सिरीयल सिनेकलाकार व खेळाडू आहेत. त्यामुळे कलाकारांना खूप संधी आहेत. गायन-वादन हे अर्थार्जनाचे साधन बनत आहे. जेथे गर्दी कमी आहे अशा ठिकाणी नवीन वाटा विद्यार्थ्यांनी शोधण्याचे आवाहन शिवाजी विद्यापीठ संयोजन समितीचे सदस्य व आजरा कालेजचे प्राचार्य डॉ. एम. एल. होलगेकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ यांचा 39 वा मध्यवर्ती युवा महोत्सव हा जगण्यास प्रेरणा व नवीन उमेद देतो. महोत्सवांमध्ये सृजनशील उमदे कलाकार घडले जातात. पळशीची पीटी या सिनेमाला 16 मानांकन मिळाली असून फ्रान्स येथील कान महोत्सवांमध्ये महाराष्ट्र शासनानेचेवतीने या चित्रपटाने प्रतिनिधित्व केले आहे. मी या महोत्सवामुळे घडलो असल्याचे पळशीची पीटी चित्रपट दिग्दर्शक धोंडीबा कारंडे यांनी सांगितले.
मुधोजी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन हा महोत्सव नवनवीन कलाकार निर्माण करीत असल्याचे कलाकार सागर मोहिते यांनी सांगितले.
कलाकार म्हणून काम करताना आज मला जे मिळाले ते या मातीतून मिळाले असून युवा महोत्सवामुळेच आपणास कलाकार होण्याची संधी प्राप्त झाली असल्याचे लागिर झालं जी फेम मालिकेतील मुधोजी महाविद्यालयातील विद्यार्थी व कलाकार महेश जाधव यांनी अभिमानाने सांगितले.
कलावंत आपली कला संधी मिळताच सादर करतो. कलावंतांमध्ये एक वेगळी ताकद असते. शैक्षणिक गुणवत्ता सध्या आपल्याला तारून नेईल याची शाश्वती नाही. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब यांच्याकडे भविष्यात पाहण्याची संधी होती त्यामुळे तालुकास्तरावर मुधोजी महाविद्यालय सुरू करून हजारोंना शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. आज दुसऱ्यांदा हा महोत्सव फलटण येथील मुधोजी महाविद्यालयामध्ये सादर करण्याची संधी शिवाजी विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे ही अभिमानाची बाब असल्याचे माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी 39 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाची पार्श्वभूमी सांगून तीन दिवस सुरू राहणार्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा आढावा घेतला.
प्रारंभी प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करुन 39 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
युवा महोत्सवात फलटणमधील विद्यार्थ्यांने मातकाम प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते तो आज परदेशात कार्यरत असल्याचे मुधोजी महाविद्यालय संयोजन समितीचे सचिव प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांनी सांगितले.
प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर, प्रा. सीता जगताप यांनी समारोप करून शेवटी आभार मानले.
39 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या दरम्यान मुख्य स्टेजवर भारतीय समूहगीत प्रकारात विविध गीते सादर करण्यात आली. यावेळी लघुनाटिका, नकला, व्यंगचित्र, वक्तृत्व या कलाप्रकारातील स्पर्धा आज पार पडल्या.
कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सातारा कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.