उमेदवार कोण हे न पाहता शिवसेनेचे धनुष्यबाण हाच उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

फलटण दि. 24 : फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना पक्षाचा हक्काचा मतदार संघ असून कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढविणार आहे. उमेदवार कोण हे न पाहता शिवसेनेचे धनुष्यबाण  हाच उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. 
 फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालय येथे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना दिवाकर रावते बोलत होते. यावेळी माजी आमदार बाबूराव माने, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी जिल्हा प्रमुख हणमंत चवरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, विधानसभा प्रमुख प्रमोद माने, संभाजी जगताप, अमोल आवळे, शिवसेना फलटण तालुकाप्रमुख प्रदीप झनझने, विकास नाळे, स्वप्नील मुळीक उपस्थित होते. 
  युती सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आणि या निर्णयाचा जनतेला फायदा झाला आहे. सातारा जिल्ह्य़ात शिवसेना पक्षाचे वर्चस्व आता वाढविले पाहिजे, आपला नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार झाला पाहिजे याची गंभीर दखल प्रत्येक शिवसैनिकाने घ्यावी. शिवसैनिक यांनी आता जागा वाटपाची चिंता करू नये असे दिवाकर रावते यांनी सांगितले. 
  फलटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकत अपेक्षेप्रमाणे मागील काही वर्षापासून वाढलेली नसली तरी लोकांच्या मनात शिवसेना पक्ष असून या भागातील कार्यकर्ते पक्षाची बांधिलकी माननारे असून तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणे ते पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. अशा कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे बाबुराव माने यांनी नेहमी पक्षाचा आदेश मानला असून विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. आपल्याकडे एक महिन्याचा कालावधी असून मतदार संघ पिंजून काढा परिवर्तन घडवा असे आवाहन रावते यांनी यावेळी केले. 
 फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक व पदाधिकारी मेळाव्यास कार्यकर्त्यांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करताना नवीन जमाना
 व नवीन पध्दतीने ही निवडणूक आता लढावी लागत असून शिवसेनेचे धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून पक्षाला ताकद द्यावी असे रावते यांनी सांगितले. 
महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष वेगळी अस्मिता घेवून काम करीत आहे. आपण ताकदीने ही निवडणूक लढविणार असून आपला विजय पक्का झाला पाहिजे यासाठी आपण कामाला लागावे असा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा आदेश असल्याचे रावते यांनी नमूद केले. 
भारत हा हिंदूंचा देश असून आगामी होवू घातलेली विधानसभा निवडणूक ही हिंदूंच्या रक्षणासाठी ची लढाई असून युतीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील मात्र सर्व शिवसैनिकांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जो उमेदवार पक्ष देईल त्याकडे न पाहता त्याचे चिन्ह धनुष्यबाण आहे हे समजून त्याला निवडून आणावे आणि विधानसभेवर भगवा फडकवावा असा नारा देत सर्वात जुना पक्ष असलेल्या शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन दिवाकर रावते यांनी केले. 
यावेळी शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकात जाधव, उपजिल्हा प्रमुख विठ्ठल गायकवाड यांची समयोचित भाषणे झाली. 
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
प्रास्ताविक प्रभारी फलटण तालुका प्रमुख विकास नाळे यांनी स्वागत केले. शेवटी मधुसुदन कदम यांनी आभार मानले. 
 यावेळी माथाडी कामगार नेते तानाजी वाघ लालासाहेब साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी  शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे शिवबंधन बांधून दिवाकर रावते यांनी स्वागत केले. 
कार्यक्रमास फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी तालुका प्रमुख उपप्रमुख विभाग प्रमुख महिला आघाडी प्रमुख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!