फलटण, दि. 24 : फलटण तालुक्यात परतीचा मान्सुन पाऊस होत असल्याने हा तालुका रब्बीचा समजण्यात येतो मात्र गेल्या 2 वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगामातील पीके वाया गेली आणि आता जनावरांसाठी छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स अशा अवस्थेत तालुका परतीच्या मान्सूनची वाट पहात असतानाच दि. 24 रोजी तालुक्यात जोराचा पाऊस झाला आहे मात्र आणखी पावसाची आवश्यकता आहे.
मंगळवार दि. 24 रोजी सकाळी संपलेल्या 24 तासात फलटण तालुक्यात सरासरी 33 टक्के पाऊस झाला असून तालुक्यातील 9 महसूल मंडल निहाय विचार करता झालेला पाऊस आणि त्यापुढे कंसात आजपर्यंत झालेला एकुण पाऊस मि.मी. मध्ये खालीलप्रमाणे. फलटण 48 (312), आसू 5 (196), होळ 8 (262), गिरवी 65 (223), आदर्की 17 (192), वाठार निंबाळकर 74 (361), बरड 23 (140), राजाळी 15 (210), तरडगाव 42 (447).
वाठार निंबाळकर आणि गिरवी महसूल मंडलात सर्वाधिक पाऊस झाला असून या महसूल मंडलातील अनेक गावात नदी, नाले, ओढ्याकाठच्या शेतजमीनी वाहून जाणे, काही ठिकाणी उभ्या पीकांचे व फळबागांचे नुकसान झाले असून राहती घरे, गुरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धुमाळवाडी आणि मांडवखडक या दोन गावात व परिसरात नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे तथापी महसूल व कृषी खात्याच्यावतीने नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येणार आहे.
मांडवखडक येथील तलाव फुटल्याने त्याखाली असणारी शेतजमीनी, राहती घरे, वस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फलटण-उपळवे मार्गावरील मांडवखडक, दालवडी ओढ्यावरील पूलाचे नुकसान झाल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने एसटी बसेस व अन्य वाहने बंद होती.
मांडवखडक व वांजाळे येथील लघुपाटबंधारे तलाव फुटल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी तहसीलदार हनुमंत पाटील, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे यांनी केली असून महसूल मंडलाधिकारी व कृषी सहाय्यकांना अतीवृष्टी व तलाव फुटल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
फलटण शहराशेजारुन वाहणार्या बाणगंगा नदीलाही कित्येक वर्षानंतर पूर आल्याने शहरवासीयांनी पहाटेपासूनच पुर पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी केली होती. पूराच्या पाण्याने शनीनगर परिसरातील नदीकाठच्या अनेक घरात पाणी शिरल्याने तेथील कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या काही शेतीचेही व तावडी, विंचुर्णी, ठाकुरकी भागात नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नगरसेवक/नगरसेविकांनी नदीकाठच्या भागाची विशेषत: पूरग्रस्त कुटुंबांना भेट देवून पाहणी केल्यानंतर दिलासा दिला आहे.
फलटण तालुक्यात गेल्या 2 दिवसात पावसाने सुरुवात केली असून परतीचा मान्सुन समाधानकारक बरसला तर यावर्षीचा रब्बी हंगाम चांगला होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्यातील दालवडी , मांडवखडक, उपळवे, वेळोशी गावातील परिसरात झालेल्या पावसाने शेतकरी यांची शेतातील उभी ऊस मका व कडधान्य आणि बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. काही जणांचे विहीरींचे नुकसान झाले आहे तथापी महसूल विभाग यांनी पाहणी केलेवर वस्तुस्थिती समोर येणार आहे.
मांडवखडक येथील पुल वाहून पावसाच्या पाण्यात एक मोटासायकल वाहून गेली असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. एका व्यक्तीस वाचविण्यात ग्रामस्थ यांना यश आले आहे. पुराच्या पाण्यामुळे रस्ता पूर्णपणे खचला आहे.
फलटण तालुक्यातील आदर्की परिसरातील वाठार स्टेशन येथील परिसरात यापूर्वी पाऊस झाल्याने तालुक्यातील आदर्की ओढ्याला पावसाचे पाणी वाहत आहे मात्र कापशी ते आंदरुड येथील कोणत्याही ओढ्याला पाणी नव्हते तथापि काल झालेल्या पावसामुळे कापशी, बिबी, घाडगेवाडी, खडकी पाटी, मिरगांव, वाठार निंबाळकर व फलटण येथील बाणगंगा नदीला पुर आला आहे.
धोम-बलकवडी व निरा देवघर धरण परिसरात यापूर्वी पाऊस झाल्याने धरणे भरली असून कनाल मध्ये यापूर्वीच पाणी सोडून ओढे तलाव व बंधारे भरुन घेण्यात आले आहेत .