फलटण दि. 17 : शहर व परिसरात डेंग्यू सदष्य सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने नगरपालिका प्रशासन यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केल्या असून नगरपालिका प्रशासन यांचेवतीने शहरात घरोघरी जावून पथक पाहणी करुन अबेटिंग करुन व फॉगिंग फवारणी करण्यात येत असल्याचे नगरपालिका प्रशासन यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
शहरामध्ये रोगांचा होणारा प्रादुर्भाव कमी करुन जनतेचे आरोग्य सदढ व तंदुरुस्त राहण्यासाठी फलटण नगरपालिका प्रशासन यांचेवतीने शहरातील घराघरात जावून पाणी साठवण्यासाठी असणारे हौद टाकी भांडी आणि अडगळीच्या ठिकाणी असणारे टायर व इतर टाकाऊ वस्तूंची पाहणी करुन अबेटिंग करण्याची कार्यवाही नगरपालिका 15 पथकांच्या माध्यमातून करीत आहे.
शहरामध्ये 8 पथके फॉगिंग करण्यासाठी नियुक्त आली असून यासाठी औषध स्प्रेअर व डिझेलचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरातील नागरीक यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी रिक्षातून ध्वनिक्षेपकावरुन व पत्रकाद्वारे स्वच्छता याबाबत नागरिक यांना आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी पाणी साठविण्याची भांडी हौद घासून वेळच्यावेळी त्याबाबत स्वच्छतेची काळजी घेवून पाणी साठवावे त्याचबरोबर पाणी झाकून ठेवावे त्यामुळे डेंग्यू आळ्या होणार नाहीत याची काळजी नागरिक यांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरामध्ये घरात कोणी आजारी पडल्यास तात्काळ वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा. शहरातील खासगी दवाखान्यात कोणी असे रुग्ण दाखल झाल्यास त्याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालय अथवा फलटण नगरपालिका प्रशासन यांच्याकडे द्यावी त्याचप्रमाणे शहरात नवीन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी चिखल व राडारोडा होणार नाही याची काळजी संबंधित यांनी घ्यावी असे आवाहन नगरपालिका यांचेवतीने करण्यात आले आहे.