फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टिकल्चर कॉलेज व अग्रीकल्चर कॉलेज फलटण येथे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित स्मृती व्याख्यानमाले मध्ये श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जीवन कार्यातील विविधता या विषयावर डॉ.प्रा.नवनाथ रासकर यांचे व्याख्यान दिनांक ११/९/२०१९ रोजी संपन्न झाले. सदर व्याख्यान दोन्ही महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित करण्यात आले होते डॉ. नवनाथ रासकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या आदर्श जीवन प्रवासाचे कथन केले. यामध्ये श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, राजकीय कार्य तसेच एका संस्थानचे राजे म्हणून जनतेसाठी केलेले कार्य याचा उल्लेख केला आहे. त्यांनी सुरू केलेल्या शाळा, विद्यार्थी वस्तीगृह, मुलींना मोफत शिक्षण, नीरा उजवा कालवा, साखर कारखाना, भूदान चळवळीतील योगदान तसेच इतर सामाजिक कार्याबद्दल डॉक्टर रासकर यांनी अतिशय उत्तमरित्या व प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी लोकहिताची कामे करताना प्रजा हेच दैवत आणि मी रयतेचा सेवक अशी भूमिका कायम ठेवली.श्रीमंत मालोजीराजे हे खर्या अर्थाने जनतेचे राजे, शेतकऱ्यांचे कैवारी होते असे प्रतिपादन डॉक्टर रासकर यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तेजस कुंजीर या विद्यार्थ्यांने केले.