आदर्की बुद्रुक दि. ७ : सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकप्रकारे वेगळे चित्र निर्माण होत असतानाही पक्ष निष्ठा महत्वाची आहे. फलटण तालुक्यात पहिले अपक्ष आमदार म्हणून ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर निवडून आल्यानंतर कोणतेही मोठे पद न घेता दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यावेळच्या सत्ताधारी यांना सांगून अपक्षांच्या पाठींब्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माध्यमातून तालुक्यातील व इतर जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडविला असल्याचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. दिपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती, लक्ष्मी मंदिर सभामंडप, स्मशानभूमी बांधणे व श्री भैरवनाथ मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांचे एकत्रित भूमिपूजन आ. दिपक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर श्री भैरवनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मार्गदर्शन करताना आ. दिपक चव्हाण बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय उफ धैर्यशील अनपट, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस सुभाषराव धुमाळ, भैरवनाथ संस्था समुहाचे प्रमुख बाळासाहेब मोहोळकर, विजय पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव धुमाळ, फलटण पंचायत समिती सभापती सौ प्रतिभाताई धुमाळ, सरपंच सौ. चित्राताई हणमंतराव काकडे, उपसरपंच समीर धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे जो राजकीय परिस्थितीचा निर्णय घेतील तो फलटण तालुक्यातील जनतेच्या हितासाठी असेल यात कोणतीही शंका नाही असे सांगून त्यांना राजकारणातील २५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तालुक्यातील अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्यासाठी ना. श्रीमंत रामराजे यांनी घेतलेला निर्णय योग्यच असेल त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी असे आ. चव्हाण यांनी सांगितले.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माध्यमातून त्यांनी पाणी प्रश्नात लक्ष घालून पश्चिम महाराष्ट्रातील धोम बलकवडी प्रकल्प पूर्ण करून घेतला. कालव्यांची कामे पूर्ण झाली असून पोटपाटाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कामांची तरतुद करण्यात आली असून सर्व्हे झाल्यानंतर ती कामेही पूर्ण होतील. शेतकरी यांच्या अडचणी समजावून घेवून अधिकारी यांनी पहाणी केलेवर पोटपाटाची कामे मार्गी लागतील. त्यासाठी आपण सर्वांनी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील आदर्की ते आंदरड या दुष्काळी भागात पाणी आल्यानंतर तालुक्यातील चित्र बदलले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अभ्यासू संयमी शांत व प्रश्नांची जाण असणारे व तळमळीने प्रश्न सोडविणारे जाणते नेते असल्याचे आ. दिपक चव्हाण यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील आदर्की ते आंदरड या दुष्काळी भागात पाणी आल्यामुळे येथील शेतकरी सुखावला असून शेतकरी यांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. आलेले पाणी ओढे नाले यामध्ये सोडून तलाव बंधारे भरुन घेतले जात आहेत मात्र ज्या ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी सिस्टीमद्वारे पाणी देण्याचे प्रयत्न केला जाणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.
फलटण तालुक्यात विकासकामे करताना मानसिक समाधान सर्वांना लाभत असून आपणही सर्वांनी राजे गट व ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी अपेक्षा आ. दिपक चव्हाण यांनी व्यक्त केली.
ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माध्यमातून आदर्की ते आंदरड पर्यंतच्या दुष्काळी भागातील शेतकरी यांना पाणी पोहोचवून शेतकरी यांना बागायतदार केले. फलटण तालुक्यात राजे गटाच्या माध्यमातून विकासाचे राजकारण करण्यात येत आहे. ना. श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील परिस्थिती बदलली आहे. तालुक्यातील एकही गाव असे नाही की जिथे विकास केला नाही. तरी राजे जो उमेदवार देतील त्याला आपण सर्वांनी विजयी करावे असे आवाहन फलटण पंचायत समिती सभापती सौ प्रतिभाताई धुमाळ यांनी केले.
यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उफ दत्ता अनपट, विश्वासराव धुमाळ सी. बी. पठाण यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमास श्री भैरवनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन संजय पवार माजी उपसरपंच तानाजीराव धुमाळ विजयकुमार धुमाळ विजयकुमार जाधव वैभव जाधव बबनराव धुमाळ हणमंतराव काकडे यांचेसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
प्रारंभी प्रकाश येवले यांनी स्वागत केले. शेवटी सी. बी. पठाण यांनी आभार मानले.