मुंबई गोवा महामार्गावर वडपाले जवळ एसटी बस जळून खाक प्रवासी सुखरुप ; मात्र प्रवाशांचे किंमती सामान गाडी बरोबर जळून खाक….

बोरघर / माणगांव : ऐन गणेशोत्सवाच्या प्रारंभी रविवार दिनांक ०१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ : ०० वाजता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगांव आणि महाड शहराच्या दरम्यान वडपाले गावाजवळ मुंबई चिपळूण दहीवली या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला परंतु चालकाने प्रसंगावधान राखल्याने बस मधील सर्व प्रवासी सुखरूप. 
     गणेशोत्सवा निमित्ताने मुंबई परळ बस स्थानकातून  कोकणातील चिपळूण दहीवली कडे मार्गक्रमण करत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने माणगांव लोणेरे सोडल्या नंतर वडपाले या गावाजवळ अचानक पेट घेतला. 
     सदर गाडी मध्ये चौसष्ट प्रवासी आणि काही लहान बालके होती. गाडीतील प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी सदर गाडीचे चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तात्काळ गाडीतील सर्व प्रवाशांना तात्काळ गाडी बाहेर काढले या प्रसंगी त्यांना स्थानिकांची देखील मौलिक मदत लाभली त्यामुळे गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप पणे गाडी बाहेर काढता आले. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही मात्र या दुर्घटनेत गाडीतील सर्व प्रवाशांचे किंमती सामान मात्र या जळत्या गाडी बरोबर जळून खाक झाले. त्यामुळे गाडीतील सर्व प्रवाशांचे ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर प्रचंड आर्थिक व वस्तू स्वरूपातील  नुकसान झाले आहे. या प्रसंगामुळे या महामार्गावर बराच वेळ वाहतूकीची कोंडी झालीच होती. या नंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!