पीएम किसान योजना नोंदणी प्रत्येक ग्रामपंचायत येथे दि. २५ ऑगस्ट पर्यंत सुरु

फलटण, दि. 23 : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत लाभार्थी नोंदणीसाठी दि. 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान फलटण तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत निहाय लाभार्थी शेतकर्‍यांसाठी शिबीरे घेवून त्यांना माहिती देवून नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून शिबीरांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तहसिलदार हनुमंत पाटील यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी दि. 9 ऑगस्टपासून देशभर सुरु करण्यात आली असून 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या राज्यातील सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र असून पात्र लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षेे पूर्ण झाल्यानंतर प्रति माह 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती मिळण्याची तरतुदही या योजनेत असल्याचे तहसिलदार हनुमंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांचेमार्फत पात्र शेतकर्‍यांना माहिती देवून व्यापक प्रमाणावर प्रचार व प्रसिध्दीद्वारे सर्व लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे सुचित करण्यात आले असून  दि. 31 ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांची नोंदणी करुन अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महसूल, कृषी व पंचायत समिती कार्यालयाच्यावतीने फलटण तालुक्यात दि. 23 ते 25 दरम्यान महसुल मंडल निहाय प्रमुख गावात योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी शिबीरांचे आयोजन करण्यात येत असून त्यानुसार शनिवार दि. 24 ऑगस्ट रोजी ताथवडा, साठे, मुंजवडी, तरडगांव, सालपे, तडवळे, आदर्की बुद्रुक, वाघोशी, खुंटे, राजाळे, विडणी, दुधेबावी. रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी आसू, हणमंतवाडी, राजूरी, आरडगांव, तांबवे, जिंती, सासवड, फलटण, कोळकी, सांगवी, गिरवी आणि वडले येथे शिबीरांचे आयोजन करण्यात येत असून पात्र लाभार्थी शेतकर्‍यांनी या शिबीरात सहभागी होवून नाव नोंदणी करावी असे आवाहन तहसिलदार हनुमंत पाटील, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, गटविकास अधिकारी सौ. गावडे यांनी केले आहे.
शिबीरात उपस्थित राहताना आपल्यासोबत 7/12, 8 अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आदी माहिती घेवून या शिबीरात सहभागी व्हावे. नोंदणी करताना कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खातून लाभार्थी हिश्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा होणार आहे.
फलटण तालुक्यात जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणीसाठी वरीलप्रमाणे शिबीराचे नियोजन करण्यात आले आहे तथापी काही तलाठी पूर परिस्थिती व निवडणूककामी कोल्हापूर येथे तसेच गटविकास अधिकारी यांचेकडील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरु आहे तर तालुका कृषी अधिकारी यांचेकडील काही कर्मचारी पूर परिस्थितीत मदतीसाठी कोल्हापूर येथे असल्याने शिबीरांचे नियोेजन यशस्वी करताना काही अडचणी होणार आहेत तथापी ज्या गावात शिबीरे यशस्वी होणार नाहीत तेथे पुन्हा नियोजन करुन शिबीरे घेण्यात येणार असल्याचे तहसिलदार हनुमंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!