फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीई आयटी शाखेच्या श्रद्धा जाधव आणि बीई ई अँड टीसी शाखेच्या मधुसूदन कदम या दोन विद्यार्थ्यांची इन्फोसिस या प्रतिष्ठित कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे.ही उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांची, तांत्रिक कौशल्यांची आणि आमच्या शिक्षक व प्लेसमेंट सेलच्या सततच्या मार्गदर्शनाची साक्ष आहे. इन्फोसिस ही आयटी क्षेत्रातील जागतिक स्तरावर कार्यरत असणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असून, त्यांची निवड प्रक्रिया अत्यंत कठोर असते. या प्रक्रियेत श्रद्धा आणि मधुसूदन यांनी आपल्या कौशल्यांचे आणि तांत्रिक ज्ञानाचे प्रभावी प्रदर्शन केले.निवड प्रक्रियेत अनेक फेऱ्यांचा समावेश होता, ज्यात अप्टिट्यूड चाचणी, तांत्रिक मुलाखत, आणि एचआर राऊंड या सर्वांचा समावेश होता. या सर्व फेऱ्यांमध्ये या दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या संपूर्ण निवड प्रक्रिये दरम्यान प्रा. सुरज कुंभार, संतोष करे आणि मयूर गावडे यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशासाठी श्रद्धा जाधव आणि मधुसूदन कदम यांचे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त आणि कार्यकारी समितीचे सर्व सदस्य, रेजिस्ट्रार, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे आमच्या संस्थेचा गौरव वाढला आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण व उत्तम करिअर संधी उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध आहोत असे मत सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विशाल कोरे यांनी व्यक्त केले.