धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता मुंबईच्या पायाभूत सुविधातील पुढचे पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, दि. १२ ): –

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर असा प्रकल्प असून यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक, जलद, दिलासादायक आणि वेळेची बचत करणारा असून मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या प्रकल्पाच्या लोकार्पणासमयी सांगितले. या प्रकल्पामुळे मरिन लाईन ते वांद्रे सी लिंक हा प्रवास केवळ 10 मिनिटात पूर्ण होणार असून यामुळे वेळ, इंधन वाचेल आणि प्रदुषण कमी होऊन मुंबईकरांची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतील गेमचेंजर प्रकल्पाचे टप्पे पुढे जात असून यानंतर वर्सोवा, भायंदर, विरारपर्यंत हा प्रकल्प सुद्धा पुढे नेत आहोत. भविष्यात मुंबई ते वर्सोवा मधील 3-4 तासाचे अंतर हे केवळ 40 ते 50 मिनिटात पार करण्यात येईल. हा प्रकल्पाचा पूल पाहतांना विदेशात असल्याचे जाणिव होत असल्याची घडणावळ असून यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा प्रकल्प बांधताना कोळी बांधवांची देखील काळजी घेण्यात आली आहे आणि त्यांना देखील न्याय दिला आहे. हे प्रकल्प पुढे पालघर पर्यंत जाणार असून वाढवण बंदराला देखील या कोस्टल रोडचा फायदा होणार आहे.

मुंबई खड्डेमुक्त करण्याबरोबरच सर्व रस्ते कॉक्रिटचे करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक कोंडीमुक्त तसेच प्रदुषण कमी करण्यासाठीही सर्व उपाययोजना केल्या असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पासाठी सर्व परवानग्‌या मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने झाले आहे. या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येत असल्याचेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

*प्रकल्पाचे ठळक मुद्दे* :* हा प्रकल्प मरीन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत बांधण्यात येत आहे. तात्पुरत्या स्वरुपात वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या दक्षिण वाहिनीवरील 827 मीटर लांबीच्या पुलावरुन उत्तर वाहिनीवर सुरू होत असलेली वाहतूक सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील. * महत्त्वाचे टप्पे – 11 मार्च 2024 रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह 9.29 किमी. दक्षिणवाहिनी मार्गिका. 10 जून रोजी मरीन ड्राईव्ह ते लोटस जंक्शन 6.25 किमी उत्तरवाहिनी मार्गिका. 11 जुलै रोजी हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडणारी मार्गिका (तात्पुरत्या स्वरुपात, 3.5 किलोमीटर) सुरू.* पुढील नियोजन : सद्यस्थितीत प्रकल्पाचे 92 टक्के काम पूर्ण. प्रकल्पातील वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारा उत्तर वाहिनीवरील मुख्य पूल व वरळी आंतरबदल डिसेंबर 2024 पर्यंत तर हाजीअली आंतरबदल येथील उर्वरित कामे (मार्गिका क्रमांक 1, 6 व 7) मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. *प्रकल्पाची वैशिष्ट्ये* :• बोगदा खनन संयंत्राच्या (TBM) सहाय्याने भारतातील सर्वात मोठा व्यास (१२.१९ मीटर) असलेल्या बोगद्याची निर्मिती.• भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायूविजन प्रणालीचा वापर.• भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी.• एकाच प्रकल्पामध्ये पुनःप्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.• भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम• या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी.• प्रवाहकीय अंदाजानुसार भारतात प्रथमच २४०० मेट्रिक टन वजनाची आणि १३६ मीटर लांबीची महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापन.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!