
गोविंद डेअरीच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे व उपस्थित सभासद वर्ग
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २० ) :-
ग्राहकांसाठी गुणवत्ता व पशुपालकांचे हित हेच गोविंद चे ध्येय असून पशुपालकांचा दुग्धव्यासाय अधिक फायदेशीर व सुखकर होण्यासाठी गोविंद डेअरी सातत्याने प्रयत्न करत असून जनावरांची उत्पादकता वाढावी, पशुपालकाचे कष्ट कमी व्हावेत व यातून निर्माण होणारे दुध हे अधिकाधिक गुणवत्ता पूर्ण व्हावे व यातून ग्राहकांचे समाधान व्हावे यासाठी गोविंद आग्रही असल्याचे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी गोविंद डेअरीच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
संजीवराजे म्हणाले, गोविंद व्यवस्थापन गरजेप्रमाणे नवनवीन योजना राबवत असून त्यांचा चांगला फायदा पशुपालकांना होत असून महिलांचे योगदान या व्यवसायात वाखाणण्याजोगे आहे. असे निर्माण होणारे आरोग्यवर्धक दुधाची साठवण व वाहतूक यासाठी चांगली दक्षता घेतली जात आहे. या दुधाची प्रक्रिया करून त्याचे उपपदार्थ तयार करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारल्यामुळे आपण आज उच्च गुणवत्तेचे पदार्थ तयार करत असून त्यास ग्राहकांची जास्त पसंती आहे. हे सर्व कामकाजाची दखल घेऊनच इंडियन डेअरी असोशियशन यांनी हैद्राबाद या ठिकाणी आदरनीय केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यापुढेही गोविंद ग्राहकांसाठी गुणवत्ता व पशुपालकांचे हित या दृष्टीकोनातून वाटचाल चालू ठेवील
कार्यक्रमाचे प्रास्तविक गोविंद डेअरीचे संचालक चंद्रशेखर जगताप यांनी केले. ते म्हणाले, गोविंद डेअरीची स्थापना हि पशुपालकांचे हित समोर ठेउनच केली असून अगदी सुरुवातीपासूनच ग्राहक व पशुपालकांचें हिताचे काम करत असून त्यानुसारच आज ३० व्या वर्षात पदार्पण करताना आनंद होत आहे. अधिक गुणवत्तापूर्ण दुध निर्मितीसाठी व पशुपालकांना अधिक फायदा मिळण्यासाठी शासकीय दुध दर अनुदान योजना, मुक्तसंचार गोठा, मुरघास, ग्रीन गोविंद बायोगास योजना, कामधेनु वंश सुधार योजना, महिला सक्षमीकरण योजना, पंजाब अभ्यास दौरा, टीएमआर अश्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असून त्याचा फायदाही होत आहे.
कार्यक्रमात दुध केंद्र चालक संदीप नरळे यांनी दुध संकलन केंद्रावर घेत असलेल्या दक्षतेबाबत व गोविंदमुळे झालेल्या प्रगती बाबत आभार मानले, प्रयोगशील आदर्श महिला पशुपालक सौ. स्वाती विजय पवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले कि श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, संचालक या गोविंद डेअरीच्या दैनंदिन कामकाजची अगदी काळजीपूर्वक देखभाल घेत असताना, पशुपालक महिला, दुध उत्पादक, डेअरी उत्पादनातील गुणवत्ता यासह सर्व देश व देशाबाहेरील वितरण व्यवस्था यावर जाणीवपूर्वक लक्ष देत आहे याची दखल अगदी देश पातळीवर सुद्धा घेतली गेली आहे व डेअरीस आदर्श पुरस्कार मिळाला आहे हि आम्हा सर्व महिला दुध उत्पादकांना अभिमानाची बाब आहे, सौ. आशाताई घाडगे यांनी पंजाब दौरा व ग्रीन गोविंद बायोगस योजनेचा त्यांचा फायदा झाल्याचे सांगितले व काजल शेख म्हणाल्या कि आज आदरणीय श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनमुळे गावातील महिला अबला नसून सबला बनत आहे असून त्या आधुनिक दुध व्यवसायाचा अवलंब करून आपली प्रगती साधत आहेत
या प्रसंगी गोविंद डेअरीचे संचालक श्रीमंत शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, चंद्रशेखर जगताप, चंद्रकांत रणवरे, गणपतराव धुमाळ तसेच असंख्य महिला दुध उत्पादक, दुध संकलन केंद्र चालक, कर्मचारी तसेच अनेक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
समारोप डॉ. शांताराम गायकवाड महाव्यवस्थापक दुग्धव्यवसाय विकास यांनी केले.