फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा, दि. 20 ) : –
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण व मयत शेतकऱ्यांचे वारसांनी वारसनोंदणी करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत शासनाची मुदतवाढ मिळाली असून शेतकऱ्यांनी मुदतीत आधार प्रमाणीकरण व वारस नोंद करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे.महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 अंतर्गत रु. 50 हजार पर्यंत लाभासाठी 18 सप्टेंबरअखेर सातारा जिल्हयातील ५१० शेतकरी आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे. यापैकी 160 शेतकरी मयत असून 350 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी वारसनोंदी बँकेत, संस्थेत स्वत: जावून करणे आवश्यक आहे. यानंतरच संबंधित बँका त्यांचे वारस व कर्ज माहिती शासनास उपलब्ध करुन देणार आहेत.सातारा जिल्हयातील राष्ट्रीयकृत,जिल्हा मध्यवर्ती , व्यापारी बँका यांनी मयत शेतकऱ्यांची वारस नोंद करुन घेवून त्याची माहिती विहीत नमुन्यात लिंकवर अपलोड करावी. सहकार खात्याचे तालुकास्तरावरील उप निबंधक व सहायक निबंधक तसेच विकास संस्थांचे सचिव, तलाठी,ग्रामसेवक यांचे सहकार्य घेवून शेतकऱ्यांचे प्रमाणीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही आवाहन श्री. सुद्रीक केले आहे.