किर्ती महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, एस. एस. टी. महाविद्यालय व झुनझुनवाला महाविद्यालय उपांत्य फेरीत

फलटण टुडे न्यूज़ नेटवर्क :-

मुंबई, महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे ४२ वी आंतरमहाविद्यालयीन खो-खो (मुले व मूली) स्पर्धेला मनोरंजन मैशन, पेरू कंपाउंड, कालबाग येथे आज पासून सुरवात झाली. या स्पर्धेचे उद्‌घाटन उपप्राचार्या डॉ. मनिषा आचारी, श्री. सुरेंद्र विश्वकर्मी (सचिव, मुंबई खो खो संघटना), श्री. मनोज पाटील (क्रीडा संचालक), व १७ संघांच्या यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला. या स्पर्धेत मुलांच्या सामन्यामध्ये किर्ती महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, एस. एस. टी. महाविद्यालय व झुनझुनवाला महाविद्यालय उपांत्य फेरी साठी पात्र ठरले आहेत.

डॉ. आंबेडकर महाविद्यालय (अ) ने अटीतटीच्या लढतीमध्ये रिझवी महाविद्यालयाने ४.३० मि. राखून १३-१२ असा एक गुणाने विजय संपादन केला. या सामन्यात डॉ. आंबेडकर महाविद्यालय (अ) च्या प्रतिक घाणेकर (४ मि. संरक्षण), राहूल जावळे ४.४० मि. संरक्षण व १ गुण), अथर्व पाष्टे (३ गुण), ज्ञानेश (३.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार लढत देत विजय खेचून आणला. तर पराभूत रिझवी महाविद्यालयाच्या सुदर्शन चव्हाण (२ मि. संरक्षण), जनार्दन सावंत (३ मि. संरक्षण) व कुसांग वैश्य (४ गुण) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली.

मुलांच्या दुसऱ्या एका सामन्यात एस. एस. टी. महाविधालयाने महर्षी दयानंद महाविद्यालय (अ) चा ११-१० असा एक गुणाने अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. या सामन्यात एस. एस. टी. च्या ऋशिकेश चोरगे (४.५० मि. संरक्षण व २ गुण), व्यंकटेश राठोड (३ गुण), निखील कदम (२.५० मि. संरक्षण व १ गुण), जयेश साटले (२.२० मि. संरक्षण) यांनी यजमान महर्षी दयानंद महाविद्यालयाला पराभवाची धूळ चारत विजय साजाराकेला. तर पराभूत महर्षी दयानंदच्या राज साटम (१.१० मि. संरक्षण व ३ गुण), सुजल शिंदे (१.१० मि. संरक्षण व २ गुण), प्रतिक राज (२२० मि. संरक्षण), ओम वाटाणे (२.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी कडवी लढत दिली मात्र ते आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

मुलांच्या तिसऱ्या सामन्यात झुनझुनवाला महाविद्यालयाने (अ) डॉ. आंबेडकर महाविद्यालय (ब) चा ११-१० असा एक डाव एक गुणाने धुव्वा उडवला. या सामन्यात झुनझुनवालाच्या धिरज भावे (3 गुण), सदाशिव पालव (२ मि. संरक्षण १ गुण), शुभम शिंदे (२.५० मि. संरक्षण व १ गुण) व सम्यक जाधव (२.३० मि. संक्षण) यांनी बहारदार खेळ करत एकतर्फी विजयात मोलाची कामगिरी केली. तर पराभूत आंबेडकरच्या अथर्व जाधव (१ मि. संरक्षण व ५ गुण), कुणाल अनभवन (१ मि. संरक्षण) व ध्रुव निवतकर (२ गुण) यांची लढत निष्प्रभ ठरली.

मुलींच्या सामन्यात एस. एन. डी. टी महाविद्यालयाने कीर्ती महाविद्यालयाचा १०-५ असा ५ गुणांनी मोठा पराभव केला. या सामन्यात एस. एन. डी. टी. च्या वैष्णवी परब (२ मि. संरक्षण), आर्या तावडे (२.३० मि. संरक्षण), दर्षीता शर्मा (३ मि. संरक्षण), साक्षी बदरीगे (३ मि. संरक्षण व १ गुण) व खूशबू सुतार (६ गुण) यांनी विजयी पायाभरणी केली तर पराभूत किर्ती महाविद्यालयाच्या दीक्षा तांबे (३.२० मि. संरक्षण व २ गुण), पूर्वा तटकरे (२.५० मि. संरक्षण व २ गुण), श्रिया नाईक (४ मि. संरक्षण) यांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्टा व्यर्थ गेली.

मुलींच्या दुसऱ्या सामन्यात एस. एस. टी. महाविद्यालयाने महर्षी दयानंद महाविद्यालयाचा ९-३ असा एक डाव ६ गुणांनी धुव्वा उडवला. एस. एस. टी. महाविद्यालयाच्या प्रिती हलगरे (४.३० मि. संरक्षण), दिव्या गायकवाड (४ मि. संरक्षण व ३ गुण) मीना कांबळे (३ मि. संरक्षण), कल्याणी कंक (४ गुण) व किशोरी मोकाशी (२ गुण) यांनी विजयात जोरदार कामगिरीचे प्रदर्शन केले तर पराभूत यजमान महर्षी दयानंदच्या काजल मोरे (२.५० मि. संरक्षण व १ गुण), जानवी लोंढे (२.२० मि. संरक्षण व १ गुण) व रतिका पवार (१ गुण) यांची लढत अपयशी ठरली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!