दि.23 जानेवारी रोजी 12 व्या ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन;संमेलनाध्यक्षपदी इंद्रजित देशमुख; शरद गोसावी यांच्या हस्ते उद्घाटन. तर याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत समारोप

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि.२२) : –

महाराष्ट्राचे भाग्यविधाते व देशाचे थोर नेते, रसिक, साहित्यिक व विचारवंत स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 12 वे ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन’ गुरुवार, दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी येथील महाराजा मंगल कार्यालयात संपन्न होत आहे. यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत तथा शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या हस्ते तर समारोप सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे उपस्थित होते.

संमेलनाच्या रुपरेषेबाबत सविस्तर माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदाचे स्व.यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. हे साहित्य संमेलन ‘शिक्षण’ या विषयाला समर्पित केलेले आहे. इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्‍या या संमेलनाचे उद्घाटन दि.23 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने म.सा.प. फलटण शाखेच्यावतीने श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व.सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध वक्ते प्रा.मिलिंद जोशी व ज्येष्ठ साहित्यिक ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे यांना, तर महाराजा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; पुरस्कृत यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार बुलढाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहसंस्थापक शिरीष देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. संमेलन उद्घाटन सत्रात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, कर्नाळा (जि.सांगली) येथील ज्ञान संसाधन व संशोधन केंद्राचे संस्थापक
महमदशफीक संकेश्‍वरा व चरित्र अभ्यासक आणि लेखक अमर शेंडे यांचा विशेष सत्कार संपन्न होणार आहे.

दुपारी 2:00 वाजता संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात ‘मराठी भाषा, साहित्य आणि वाचन संस्कृतीमध्ये शिक्षकांचे योगदान’ या विषयावर प्रसिद्ध वक्ते प्राचार्य रविंद्र येवले यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे (कोल्हापूर), पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष नाना उर्फ जगन्नाथ शिवले, ग्रामीण कथाकार व समाजप्रबोधक प्रा. रविंद्र कोकरे सहभागी होणार आहेत. संमेलनाचा समारोप सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते म.सा.प.फलटण शाखा आयोजित प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्त्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार असल्याचेही, बेडकिहाळ यांनी यावेळी नमूद केले.

सदर एकदिवसीय साहित्य संमेलनास फलटण शहर व तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील तमाम साहित्यप्रेमी, शिक्षणप्रेमी व यशवंतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!