फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा / प्रतिनिधी):-
सातारच्या साहित्यक्षेत्राला संजीवनी देणाऱ्या मसाप शाहुपुरी शाखेने गेल्या १३ वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांचे अनुकरण राज्यातील साहित्य क्षेत्राने केले आहे. नुकतीच मसाप, शाहुपुरी शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. नवीन कार्यकारिणीने सुध्दा मसाप, पुणे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नवनवीन उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार शाहुपुरी शाखेतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी साहित्य कृती २० फेब्रुवारीपर्यंत पाठवण्याचे आवाहन शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
पत्रकात, साहित्य पुरस्कार योजना प्रतिवर्षी फक्त सातारा जिल्हयातील उत्तम साहित्यकृतींना पुढीलप्रमाणे पुरस्कार दिले जाणार आहेत. श्री. छ.थोरले प्रतापसिंह महाराज जीवन गौरव पुरस्कार सातारा जिल्हयातील ज्येष्ठ साहित्यिकास दिला जाईल. पुरस्कार रोख रक्कम, शाल व सन्मानचिन्ह, उत्तम बंडु तुपे कादंबरी पुरस्कार रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह, प्रा. अजित पाटील कथा पुरस्कार रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह. बा. सी. मर्ढेकर कविता पुरस्कार रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह. रा.ना. चव्हाण वैचारिक ग्रंथ पुरस्कार रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह. वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह. चरित्र,आत्मचरित्र, ललित लेखन, प्रवास वर्णन, नाटक वरील पुरस्कारांचे वितरण प्रतिवर्षी शाहुपुरी शाखेच्या वर्धापन दिन समारंभात केले जाईल. पुरस्कार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या वर्षात प्रसिध्द होणऱ्या कलाकृतीच्या पहिल्या आवृत्तीसंच दिला जाईल. पुरस्कार निवडीसाठी समिती त्या – त्या वळी निवडली जाईल. यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड समिती तयार करण्यात आली आहे. २०२४ च्या साहित्य पुरस्कारासाठी कादंबरी, कथा, कविता, वैचारिक ग्रंथ व संकीर्ण चरित्र, आत्मचरित्र, ललित लेखन, प्रवास वर्णन इ. नाटक लेखकाने पुस्तके पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या काळात प्रसिध्द झालेल्या पहिल्या आवृत्तीचाच विचार केला जाईल. लेखकाने २ प्रती पाठवल्या पाहिजेत.
साहित्य कृती पुर्णपणे स्वरचितच असावी, अनुवाद चालणार नाही. ही अट संकीर्ण मधील अनुवादित साहित्याला लागू नाही. लेखकाने साहित्य २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत पाठवावे त्यानंतर आलेल्या पुस्तकांचा विचार केला जाणार नाही. पुस्तके नंदकुमार ज. सावंत, ७०२, मंगळवार पेठ, सातारा या पत्त्यावर पाठवावीत, असे आवाहन मसाप शाहुपुरी शाखेचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे यांनी दिली आहे.
चौकट
निधीच्या व्याजातून देण्यात येणार पुरस्काराची रक्कम
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी शाखेतर्फे पुरस्कार देण्यात यावेत, अशी संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ यांनी मांडली. त्यास मसाप पुणे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि डॉ. उमेश करंबेळकर यांनी पाठिंबा दिला. या पुरस्कारासाठी एक कायमस्वरुपी निधी उभारण्यात येत आहे. त्या निधीच्या व्याजातून येणाऱ्या रक्कमेतून पुरस्काराची रक्कम देण्यात येणार आहे. आतापर्यंत कार्यकारिणी सदस्यांनी १ लाख ३३ हजार रुपयांचा निधी स्वत: देणगी देऊन तयार केला आहे. या पुरस्कार निधीसाठी ज्यांना निधी द्यायचा आहे, त्यांनी मसाप शाहुपुरी शाखेच्या अध्यक्षांशी संपर्क साधावा.