फलटण शहरातील माऊलींची वाट बिकटच

शहरातील संपूर्ण पालखी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

फलटण टुडे वृत्तसेवा ( दि.२० जून २०२५): – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचे आज मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रस्थान संपन्न होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरजन यांनी पाहणी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र फक्त पाट्या टाकायचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. माऊलींचे आळंदी येथून प्रस्थान झाले असले तरी सुद्धा फलटण शहरातील माऊलींची वाट अद्याप बिकटच आहे. शहरातील संपूर्ण पालखी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पालखी मार्गाची अनेक वेळा पाहणी करून सुद्धा शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था आहे.

ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी पालखी मार्गाची व पालखी तळाची पाहणी केली होती त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखी प्रस्थानाच्या आतमध्ये शहरातील सर्व रस्त्यांच्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरजन यांनी पाहणी करून सूचना देऊन सुद्धा शहरातील पालखी मार्गाची अवस्था बिकटच आहे. यामध्ये असणारा पालखी मार्ग हा बहुतांश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यत्यारित आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मात्र पाट्या टाकून अन्य फायद्याच्या विषयात मग्न असल्याच्या चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

चौकट :

सचिन ढोलेंची उणीव यंदाची वारी अनुभवणार

मागील वर्षी फलटणचे प्रांताधिकारी म्हणून सचिन ढोले हे कार्यरत होते. सचिन ढोले हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. यासोबतच ते स्वतः विठ्ठल भक्त असल्याने त्यांनी पालखी काळामध्ये वारीचे नेटके नियोजन केल्याचे बघायला मिळाले होते. गत काही महिन्यांपूर्वी सचिन ढोले यांची बदली महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी झाली होती त्यानंतर त्यांची पदोन्नतीने मुंबई उपनगर विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली सध्या सचिन ढोले नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) चे सह आयुक्त म्हणून बदली झाली आहे. यंदाच्या वर्षी सचिन ढोले यांच्यासारख्या अधिकाऱ्याची उणीव मात्र पालखी सोहळ्यात अनुभवली जात आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!