मंगळवारपासून बोर्डाची फेरपरीक्षा

पावसाळा लक्षात घेऊन वेळेत पोहोचण्याचे विभागीय मंडळाचे आवाहन
फलटण टुडे वृत्तसेवा (कोल्हापूर दि २३ जून २०२५):- जून-जुलै २०२५ ची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेरपरीक्षा परीक्षा २४ जून ते ८ जुलै आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे. मंगळवारी बारावीच्या परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाने तर दहावीची सुरुवात मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे.
इ.१०वी व इ.१२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ज्या त्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातच होणार असून यासह अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे गुण मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.in यावर माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉगिनद्वारे फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेप्रमाणे चेकर व मेकरचा अवलंब करुन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २४ जून ते ४ जुलै या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने नोंदवायचे आहेत. शिवाय मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी प्राचार्य / मुख्याध्यापक यांचा शिक्का व स्वाक्षरीसह तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणतक्ते विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन विभागीय मंडळात जमा करावयाचे आहेत. जून-जुलै २०२५ परीक्षेकरीता आऊट ऑफ टर्नच्या संधी उपलब्ध राहणार नाहीत.
परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार सवलती देण्यात येत आहेत.
मागील परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ प्रमाणेच याही परीक्षेत पेपरच्या निर्धारित वेळेनंतर सर्व परीक्षार्थींना शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहेत.
असे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले.
सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक ती काळजी घेऊन वेळेत पोहोचण्याचे आवाहन कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.