फलटण टुडे वृत्तसेवा (सोलापूर, दि. ३ जून २०२६): – स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी, नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरू असलेल्या ५२व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत बुधवारी रंगलेल्या साखळी फेरीतील सामन्यांनी स्पर्धेची उत्कंठा अधिकच वाढवली. मुलींच्या गटात नंदुरबार आणि धुळे यांनी चुरशीच्या लढतीत निसटते विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर कुमार गटात मध्यंतराला पिछाडीवर असलेल्या लातूरने जालनावर शानदार पुनरागमन करत विजय मिळवला. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कृतिमा नाईकच्या अष्टपैलू खेळीने नंदुरबारची विजयी घोडदौड
मुलींच्या गटातील अत्यंत रंगतदार सामन्यात नंदुरबारने जळगाववर ३६-३१ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. मध्यंतराला १९-१७ अशी मिळालेली आघाडी अखेर निर्णायक ठरली. नंदुरबारच्या कृतिमा नाईक (२ मि. संरक्षण व ६ गुण) हिने अष्टपैलू खेळ करत विजयाचा पाया रचला. तिला सोनल वसावे (६ गुण) आणि प्रतीक्षा गावित (६ गुण) यांनी आक्रमणात मोलाची साथ दिली. जळगावकडून गौरी जाधव (८ गुण) हिने झुंजार खेळी केली, मात्र तिचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरे पडले.

धुळ्याने रायगडची मुसंडी रोखली; नंदिनी सिसोदियाची कमाल
दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात धुळ्याने रायगडचा ३१-२८ असा निसटता पराभव करत पुढील फेरी गाठली. मध्यंतराला १२-२२ अशी पिछाडी असूनही रायगडने जोरदार पुनरागमनाचा प्रयत्न केला. साक्षी शेट्टी (२ मि. संरक्षण व ६ गुण) आणि अनया अरसुल (२.३० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. मात्र धुळ्याच्या नंदिनी सिसोदिया (१.२० मि. संरक्षण व १० गुण) हिने एकहाती आक्रमण करत सामना फिरवला, तर हर्षदा कोळी (२.५० मि. संरक्षण व २ गुण) हिने भक्कम साथ दिली आणि धुळ्याचा विजय निश्चित केला.

लातूरची दमदार कमबॅक; जालनाचा पराभव
कुमार गटातील दिवसातील सर्वाधिक लक्षवेधी सामन्यात लातूरने मध्यंतराच्या १३-१६ अशा पिछाडीवरून पुनरागमन करत जालनाचा ३४-३१ असा ३ गुणांनी पराभव केला. लातूरच्या विजयात आदित्य जाधव (२ मि. संरक्षण व ६ गुण) आणि श्रीशैल बिराजदार (१.३० व ३.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. जालन्याकडून आयन पठाण (३.२० मि. संरक्षण व ४ गुण) याने चिवट झुंज दिली; मात्र त्याला सहकाऱ्यांची अपेक्षित साथ मिळाली नाही.
प्रतीक नगारेच्या अष्टपैलू खेळीने धुळ्याची परभणीवर सरशी
कुमार गटातील आणखी एका चुरशीच्या सामन्यात धुळ्याने परभणीवर ४०-३४ असा ६ गुणांनी विजय मिळवला. धुळ्याकडून प्रतीक नगारे (२.३० व १ मि. संरक्षण व ८ गुण) याने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. परभणीकडून शिवराज चिंचलवाड (१.२० मि. संरक्षण) याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र धुळ्याची सरस कामगिरी त्यांच्यासाठी अडथळा ठरली.
एकतर्फी सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा
दिवसभरातील बहुतांश अन्य सामने पूर्णपणे एकतर्फी झाले. अनेक संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः धुव्वा उडवत किंवा दणदणीत पराभव करत पुढील फेरीतील आपली दावेदारी भक्कम केली. स्पर्धेची पातळी आणि संघांमधील स्पर्धात्मकता पाहता पुढील बाद फेरीतील सामने अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले संघ
कुमार गट : धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे, सांगली, लातूर, पुणे, पालघर, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे, बीड, अहिल्यानगर आणि मुंबई.
मुली गट : सांगली, नंदुरबार, ठाणे, परभणी, धाराशिव, मुंबई उपनगर, सोलापूर, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जालना, सातारा, मुंबई, रत्नागिरी आणि धुळे.

