फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. १३ ऑक्टोबर २०२६):- शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, सातारा, खंडाळा, महाबळेश्वर हे तालुके दुष्काळाच्या ट्रीगर -१ या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर आहेत.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने हरभरा, ज्वारी, गहू, मका, इ. पिकांची सुमारे २ लाख ८ हजार हे. क्षेत्रावर लागवड केली जाते. तंत्रज्ञान आधारित पीक प्रात्यक्षिक व बियाणे वाटप अंतर्गत, आगामी रब्बी हंगामामध्ये कृषी विभागामार्फत हरभरा, ज्वारी, मका प्रात्यक्षिकांचे २ हजार ९९० हे. क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे.
तसेच हरभरा, ज्वारी, मका या पिकांचे ७ हजार २७ क्विंटल इतके प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. याशिवाय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीट व्यवस्थापन या बाबींसाठी ७ हजार हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देण्यात येणार असून, त्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध जनजागृती मोहिमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यादरम्यान हवामान अनुकूल शेती पद्धती, तंत्रज्ञान प्रचार व प्रसार, ऊस पाच ट व्यवस्थापन, फळबाग लागवडीमध्ये सी.आर.ए. तंत्रज्ञान वापर, आच्छादनांचा वापर, सूक्ष्मसिंचन बाबत प्रचार प्रसिद्धी, जमीन आरोग्य पत्रिका आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता, सेंद्रिय खत निर्मिती, इ. विषयांवर गावोगावी २५ हजार मोहिमा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन केलेले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. प्रशिक्षण व शेतीशाळांच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी रब्बी हंगामामध्ये २१० प्रशिक्षण व ४० शेतीशाळा राबवण्यात येणार आहेत.
