अन्न व औषध प्रशासनाचे सातारा जिल्ह्यातील अन्न व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक आणि हॉटेल चालकांना विशेष आवाहन


फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 14 ऑक्टोबर २०२६):- अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार ग्राहकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न पदार्थ मिळण्याच्या उद्देशाने सातारा जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक संस्था, संकलन केंद्रे आणि दूध वाहतूकदार यांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. दूध वाहतुकीसाठी प्लास्टिक कॅनच्या वारंवार वापरामुळे प्लास्टिकचा अंश दुधात मिसळून ते मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकते. तसेच वाहतुकीदरम्यान आवश्यक तापमान नियंत्रित न राहिल्यास प्लास्टिक कॅनमधील दूध नासण्याची शक्यता असते, त्यामुळे दूध वाहतुकीसाठी प्लास्टिक कॅन ऐवजी स्टेनलेस स्टीलच्या कॅनचाच वापर करावा. 
याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट चालक तसेच चायनीज, बिर्याणी आणि इतर तयार अन्न पदार्थ विक्रेत्यांना जनआरोग्याच्या दृष्टीने अन्नामध्ये कोणत्याही प्रकारचे खाद्यरंग न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे खाद्यरंग केवळ स्वीट व बेकरीजन्य पदार्थांमध्येच ठराविक प्रमाणात (१०० पीपीएम पर्यंत) वापरण्यास परवानगी आहे. 
तसेच अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी लहान मुलांच्या आरोग्यासाठी शाळांच्या गेटपासून ५० मीटरच्या परिसरात साखर, मीठ व तेलाचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांच्या उत्पादन व विक्रीस बंदी घातली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा परिसरातील सर्व अन्न व्यावसायिकांनी अशा पदार्थांची विक्री करू नये. 
अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक जिल्हा कार्यालयाकडून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्लास्टिक कॅन वापरणारे दूध वाहतूकदार, खाद्यरंगांचा वापर करणारे हॉटेल व रेस्टॉरंट चालक आणि शाळांच्या ५० मीटर परिसरात जास्त साखर, मीठ व तेल असलेले पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी जनआरोग्याच्या हितासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!