फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १८ ऑक्टोबर २०२६): –
फलटण ते पुसेगाव रस्त्यावर वाठार निंबाळकर (ता. फलटण) गावच्या हद्दीत एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास वाठार निंबाळकर हद्दीतील सुनील कुंभार यांच्या वीट भट्टीजवळ हा अपघात घडला. अमर धोंडीराम चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 11 / CV 3235) पत्नी सुचिता, मुलगी कु. आरोही आणि मुलगी कु. आराध्या यांच्यासह जात होते. यावेळी पुसेगावच्या बाजूकडून येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या चालकाने अत्यंत बेदरकारपणे, चुकीच्या बाजूने (रॉंग साईड) व भरधाव वेगात वाहन चालवून चव्हाण यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील अमर चव्हाण, त्यांची पत्नी सौ. सुचिता चव्हाण, मुलगी आरोही व मुलगी आराध्या हे सर्वजण गंभीर व किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक जखमींना कोणतीही मदत न करता व पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र सौ. सुचिता अमर चव्हाण (वय २७) यांचा उपचारादरम्यान रुबी हॉस्पिटल, पुणे येथे दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी महेंद्र भगवान पुंडेकर (वय ३५, रा. वाठार निंबाळकर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा (गु.र.नं. ६११/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत. पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनाचा शोध सुरू केला असून, या अपघाताबाबत अथवा पळून गेलेल्या वाहनाबाबत काहीही माहिती असल्यास नागरिकांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे (०२१६६-२२२५३३) किंवा सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ (८६०५०४२७७७), पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार (९८५१९१५१५१) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

