साहित्यिकांनी संवेदनशील राहून ज्वलंत प्रश्‍नांवर सडेतोड लिखाण करावे : डॉ. राजेंद्र माने

मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र माने. व्यासपीठावर प्रा. नितीन बानगुडे पाटील, दिलीपसिंह भोसले, महादेव गुंजवटे, ताराचंद्र आवळे.


फलटण टुडे (फलटण): –

‘‘साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्यिकांच्या लेखणीने समाजाला दिशा मिळत असते. त्यामुळे अलीकडील काळातील साहित्यिकांनी संवेदनशील राहून ज्वलंत प्रश्‍नांवर सडेतोड लिखाण करावे. याच्यातून समाज प्रबोधना बरोबर सामाजिक प्रश्‍नांना वाचा फुटेल. नवसाहित्यिकांनी जुन्या साहित्यिकांच्या साहित्याचा अभ्यास करून नवबोध घ्यावा व त्यातून प्रेरक असे साहित्य निर्माण करावे,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.


महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण आयोजित व येथील सदगुरू प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने पार पडलेल्या राज्यस्तरीय स्व.यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात फलटण तालुक्यातील साहित्यांचा सत्कार व प्रा.राहुल कुलकर्णी (कोल्हापूर) यांचा ‘हसवेगिरी’ हा एकपात्री विनोदी कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ.माने बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा.नितिन बानगुडे पाटील, स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी – बेडके, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, कार्यवाह ताराचंद्र आवळे, कोषाध्यक्ष महादेव गुंजवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राहुल कुलकर्णी यांनी आपल्या विविधांगी एकपात्री प्रयोगातून हास्याचे फवारे उडवत उपस्थितांना खळखळून हसवले. ‘‘एकपात्री प्रयोग हे दुसरे तिसरे काही नसून, परक्या प्रवेशाचाच अनुभव असतो. तुम्हाला त्यातील पात्रे अंगात भिनवावी लागतात. त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. तेव्हाच ते रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते,’’ अशा शब्दात राहुल कुलकर्णी यांनी एकपात्री कलाकाराचे विश्‍व उलगडले.

वेगवेगळे भाषिक, चित्रपटातील गाणी, उखण्यातील विविधता, एस. टी. अथवा रेल्वे स्टेशन, स्मशानभूमी येथील प्रसंगातही विनोद कशा प्रकारे होऊ शकतात याचे एकपत्री प्रयोगातून झालेल्या सादरीकरणाने उपस्थितांचे हास्य खुलवत ठेवले. रसिकांनी राहुल कुलकर्णी यांच्या हास्य कल्लोळ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रारंभी स्व.बी.के.निंबाळकर यांचे वतीने सुशांत निंबाळकर, ज्ञानेश्‍वर बडवे, पोपटराव बर्गे, पांडुरंग सुतार, प्रा. मधुकर जाधव, प्राचार्य रविंद्र येवले, महादेव गुंजवटे, प्रा.रविंद्र कोकरे, ताराचंद्र आवळे, अमर शेंडे, स्नेहल तगारे, आशा दळवी, अतुल चव्हाण, ज.तु.गार्डे या फलटण तालुक्यातील साहित्यिकांचे सत्कार उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या प्रमुख अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले, श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रदीप झणझणे, प्राचार्य शांताराम आवटे, रविंद्र बर्गे, सौ.अलका बेडकिहाळ, राजकुमार जगताप, भाजपा जिल्हाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, हेमंत कासार, दादासाहेब कचरे यांच्यासह जिल्ह्यातील रसिक श्रोते उपस्थित होते.

म.सा.प.फलटण शाखा कार्यवाह ताराचंद्र आवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यवाह अमर शेंडे यांनी आभार मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!