पुणे (फलटण टुडे वृत्तसेवा ) : पुण्यावरून बेंगलोरला जाणारा ४० हजार कोटी रूपये खर्चाचा नवा एक्सप्रेस तयार करण्याचे नियोजन सुरू असून पुण्यावरून फलटणमार्गे सांगलीवरून बेळगावच्या बाजूने हा मार्ग बेंगलोरला जाईल, असे गडकरी यांनी आज पुण्यात जाहीर केले.
या रस्त्याच्या संदर्भाने पुण्यात लवकरच या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल.वाढत्या पुण्याची वाहतूक कोंडी आणि प्रदूषण लक्षात घेऊन पुण्याला पर्यायी नवीन पुणे शहर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसवता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.या रस्त्याच्या भूसंपादनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत करण्यात तयार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
हैदराबादला ३५ हजार कोटी तर बेंगलोरला ४० हजार कोटी रूपये खर्च करून रिंग रोड बांधण्याचे काम सुरू आहे. पुण्यातही रिंगरोडची तयारी सुरू आहे. या रस्त्यासाठी भूसंपादन करून द्या मी रस्ता बांधून देतो, असे गडकरी यांनी सांगितले.तळेगाव ते वाघोली व पुढे शिरूरपर्यंत उड्डाणपूल करण्याचे अंतीम करण्यात आले आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
पुण्याला वायू, हवा ध्वनी प्रदूषणापासून मुक्ती हवी असल्याचे गडकरी यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी जुन्या पुण्याच्या अरठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘ मोठी बहीण पुण्यात राहात होती त्यावेळी लहानपणी मी पुण्यात यायचो. पर्वतीला फिरायला जायचो. पुण्याची हवा तेव्हा वेगळी होती. प्रदूषणाने आता पुण्याची वाट लागली आहे. आपण साऱ्यांनी मिळून पुण्याला प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुण्याला मोठी परंपरा आणि ऐतिहासिक वारसा आहे. या शहराचा विस्तार होताना याचा विचार करून विकासाची दिशा आपण ठरवायला हवी.’’
पुण्यातील वाढती गर्दी आणि प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करून गडकरी म्हणाले, ‘‘ प्रदूषण मुक्तीसाठी आपण साऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. विकासाच्या कामात राजकारण आणायचे नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे पक्ष, विचार वेगळे असले तरी विकासाचे काम करीत असताना आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजाच्या विकासाचा विचार करायला हवा.