फलटण दि. ७ : फलटण शहर व तालुक्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मृत्यू दरही वाढला असल्याने कोरोना बाधीतांच्या अंत्यसंस्कारा साठी सध्या वापरण्यात येत असलेल्या पुणे-पंढरपूर रस्त्यावर, नीरा उजवा कालव्या लगत राव रामोशी पुलाशेजारी असलेल्या स्मशानभूमीचा विस्तार व तेथील सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेली सदर स्मशानभूमी ग्रामस्थांच्यादृष्टीने सोईची नसल्याने फारशी वापरली गेली नाही, मात्र कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सदर स्मशानभूमी सोईची असल्याने गतवर्षीपासून त्याचा वापर सुरु झाला मात्र अलीकडे दररोज ८/१० काहीवेळा त्यापेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने विस्ताराची योजना हाती घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे २ लाख ९० हजार रुपये खर्च करुन या स्मशान भूमीमध्ये सध्याच्या एक शेडच्या शेजारी आणखी दोन शेड उभारण्यात येत असून सध्याच्या शेड मध्ये एकाच वेळी २ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा आहे, विस्तार पूर्ण झाल्यानंतर तेथे एकाचवेळी ६ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करता येतील अशी माहिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांनी दिली आहे.
सदर स्मशानभूमी मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला असल्याने एकाच वेळी अनेक मृतदेहांवर होणारे अंत्यसंस्काराचे सततचे दृष्य मन हेलावणारे असल्याने या मार्गावरुन सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मागणीचा विचार करुन सदर ठिकाण बंदिस्त करण्याची सूचना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी क्रेडाई संस्थेला केल्यानंतर संस्थेने सुमारे २ लाख रुपये खर्च करुन या स्मशान भूमीच्या रस्त्याच्या बाजूकडील दोन्ही बाजूला पत्रे लावून सदर ठिकाण पत्रे व गेट लावून बंदिस्त केले आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी क्रेडाईला धन्यवाद दिले.
आज क्रेडाईच्या या कामाची पाहणी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर मोहन यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, क्रेडाईचे महेंद्र जाधव त्यांचे सहकारी क्रेडाई अध्यक्ष जावीद तांबोळी, सेक्रेटरी युवराज निकम, किरण दंडिले व अन्य पदाधिकारी सभासद उपस्थित होते.