फलटण दि. ११ : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या लोणंद फलटण रेल्वेमार्गावरील रेल्वे सेवेचा आज बुधवार दि .11 सप्टेंबर रोजी फलटण रेल्वे स्थानकावरुन हिरवा झेंडा दाखवून फलटण ते लोणंद रेल्वे सेवेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, कृषी पाणी पुरवठा राज्यमंत्री व सातारचे सहपालक मंत्री सदाभाऊ खोत, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, धैर्यशील मोहिते पाटील, विश्वासराव भोसले, स्वराज संघटनेचे दिगंबर आगवणे, हणमंतराव मोहिते, डॉ. जे.टी.पोळ, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, पुणे विभाग रेल्वे मंडल प्रबंधक मिलींद देवुस्कर व अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांची स्वप्नपूर्ती व लोकांनी गेल्या 23 वर्षापासून केलेल्या रेल्वेसेवा अपेक्षा पूर्तीचा हा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभई शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेचे जनरल मॅनेजर ए.के.गुप्ता व त्यांचे सहकारी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याने आभार व्यक्त करुन फलटणकरांची साथ मिळाली आणि हे शक्य झाले असे सोलापूर रेल्वे विभाग अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
फलटण हे अंतर २६ किलोमीटर एवढे असून फलटण-लोणंद मार्गावर सकाळी 2 आणि दुपारी 2 अशा 4 फेर्या होणार असून त्यासाठी तरडगाव व सुरवडी ही दोन रेल्वे स्टेशन्स आहेत आगामी काळात ही रेल्वे सेवा फलटण-पुणे आणि फलटण-कोल्हापूर मार्गावरही सुरु करण्याचे विचाराधीन असल्याचे पुणे मंडल रेल्वे प्रबंधक मिलिंद देवुस्कर यांनी सांगितले.
प्रारंभी पुणे मंडल रेल्वे प्रबंधक मिलींद देवुस्कर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केला.