उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती; फलटणमध्ये शिवसेनेचा भव्य सत्कार आणि आढावा सोहळा

कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात उद्या आयोजन; विजयी सदस्यांचा होणार गौरव, आगामी रणनीतीवर चर्चा.

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २६ मे २०२६):-

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने आगामी संघटनात्मक कामकाज, पदाधिकारी निवड आढावा, बीएल-२ (BL-2) मतदार नोंदणी अभियान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्याने विजयी झालेल्या सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कोळकी (फलटण) येथील अनंत मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यामुळे फलटण आणि कोरेगाव परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या भव्य कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. उदयजी सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर व महायुतीच्या माध्यमातून विजयी झालेल्या सर्व सदस्यांचा या व्यासपीठावर उद्योगमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

सत्कार सोहळ्यासोबतच, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरिक्षण मोहिमेच्या अंतर्गत ‘बीएल-२’ नोंदणी अभियानाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेतला जाईल. तसेच आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि नवीन जबाबदाऱ्यांवरही चर्चा होणार आहे. शिवसेना २५५- फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले असून, मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!