इनडोअर क्रिकेट स्पर्धाटीपीएल-३ वर वियोम फाउंडेशनची विजयी मोहोर!बृहन्मुंबई महानगरपालिकेचा १२४ धावांनी धुव्वा

वियोम फाउंडेशनचा कर्णधार ओमकार पाटोळे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई दि २९ जून २०२६):

अंधेरीतील चित्रकूट टर्फवर रंगलेल्या ‘टॅक्स सही है प्रीमियर लीग (टीपीएल) – सिझन ३’ इनडोअर क्रिकेट स्पर्धेची अखेर अक्षरशः दणदणीत झाली. अंतिम सामन्यात अनुभवी वियोम फाउंडेशनने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (बीएमसी) तब्बल १२४ धावांनी एकतर्फी पराभव करत विजेतेपदावर दिमाखात नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत सर्वांगसुंदर कामगिरी करणाऱ्या कर्णधार ओमकार पाटोळेने अंतिम सामन्यातही दमदार फलंदाजी करत ‘स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ हा बहुमान पटकावला. एमजीए फाउंडेशन आयोजित आणि महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेखाली झालेल्या या स्पर्धेने मुंबईतील इनडोअर क्रिकेटला नवे शिखर गाठून दिले. तसेच या स्पर्धेला आसा ॲब्लॉय, आरडीसी काँक्रिट, एयू बँक, अँड्रोमेडा यांनी मोलाचे सहकार्य केले.

अंतिम फेरीत वियोम फाउंडेशनचा सर्वांगसुंदर दबदबा
साखळी फेरीत प्रतिस्पर्ध्यांना नमवून अंतिम फेरीत दाखल झालेल्या वियोम फाउंडेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित होती. मात्र मैदानावर वियोम फाउंडेशनने प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवत प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी दिली नाही. नाणेफेक जिंकून बीएमसीने प्रथम गोलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा डाव नंतर पूर्णपणे कोलमडून पडला.

सुरुवातीचा धक्का… पण ओमकारने बदलले सामन्याचे चित्र!
बीएमसीचे रुपेश चुनेकर आणि ऋषीकेश जाधव यांनी सुरुवातीला अप्रतिम गोलंदाजी करत श्रेयसला तब्बल तीन वेळा बाद केले. त्यामुळे वियोमच्या पहिल्या जोडीला दोन षटकात केवळ ४ धावाच करता आल्या. मात्र त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार ओमकार पाटोळेने आक्रमक फलंदाजी करत २० धावांची खेळी साकारली आणि संघाचा डाव सावरला. यानंतर अश्विन डोंगरे आणि प्रसाद आंब्रे यांनी २९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. अखेरीस अनिकेत माडीये आणि रोहित खरात यांनी तुफानी फटकेबाजी करत २६ धावा जोडल्या आणि वियोम फाउंडेशनने ७९ धावांचा स्पर्धात्मक स्कोअर उभारला.

बीएमसीची फलंदाजी कोसळली
७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बीएमसीच्या फलंदाजांनी संयम गमावला. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात एकामागोमाग एक विकेट गमावत त्यांनी अक्षरशः हाराकिरी केली. वियोम फाउंडेशनच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर बीएमसीचे फलंदाज तब्बल १७ वेळा बाद झाले. परिणामी त्यांच्या खात्यात वजा ४५ धावा जमा झाल्या आणि वियोम फाउंडेशनने १२४ धावांच्या विक्रमी फरकाने विजेतेपद पटकावत स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

ओमकार पाटोळे ठरला स्पर्धेचा ‘सुपरस्टार’, मिळाली ‘मोहसिन खान’च्या स्वाक्षरीची बॅट
संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या ओमकार पाटोळेने अंतिम सामन्यात नेतृत्व, फलंदाजी आणि संघबांधणी या तिन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला ‘स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंतिम सामन्यातही त्याने संघाला संकटातून बाहेर काढत विजेतेपदाचा पाया रचला. त्यामुळे त्याला ‘मोहसिन खान’च्या स्वाक्षरीची बॅट देऊन गौरवण्यात आले. साखळी फेरीत सुध्दा ओमकारच्या नेतृत्वाखाली वियोम फाउंडेशनने सर्व सामन्यात १०० पेक्षा जास्त धावा केल्याने त्यांनाच विजेतेपदाचे दावेदार समजले जात होते. विजयानंतर वियोम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर यांनी समाधान व्यक्त करताना सर्व खेळाडूंचे कौतुक केले व हा सांघिक कामगिरीचा विजय असल्याचे स्पष्ट केले. तसेच कर्णधार ओमकार पाटोळेने संघाची गरज लक्षात घेऊन मैदानावर निर्णायक क्षणी सहकाऱ्यां बरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले.

मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार समारोप
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अॅड. अमित मेहता आणि आमदार हरून खान यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी अॅड. राजनारायण यादव (उपाध्यक्ष, भाजप उत्तर-पश्चिम जिल्हा, मुंबई), अॅड. अवनीश तीर्थराज सिंग (अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा – काँग्रेस), मनीष अग्रवाल (सीए, अध्यक्ष – एमजीए फाउंडेशन), बाळ तोरसकर (संस्थापक सचिव – महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन), महिमा अग्रवाल (सीए, उपाध्यक्ष – एमजीए फाउंडेशन), विनया तोरसकर (अध्यक्षा – वियोम फाउंडेशन), प्रमोद पतोडीया (चॉईस ग्रुप) व पुरुषोत्तम यादव (उपाध्यक्ष, समाजवादी पार्टी, उत्तर-पश्चिम जिल्हा, मुंबई), स्नेहा पाटील (सीए-) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नीता, श्वेता, दक्ष, आकाश मेहता आणि संपूर्ण एमजीए टीम यांनी परिश्रम घेतले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!