कारखाना चालवण्यास प्रशासन पूर्णपणे सक्षम; राजकीय षडयंत्राला बळी पडू नका; आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

श्रीराम’ कारखान्याला शासनाने राज्य हमी द्यावी, विरोधकांच्या हातामध्ये कारखान्याच्या चाव्या देऊ नका, सभासदांना दिला स्पष्ट इशारा.

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण ,१५ जुलै २०२६ )

फलटण तालुक्यातील ‘श्रीराम’ सहकारी साखर कारखाना चालवण्यास प्रशासन आणि सभासद पूर्णपणे सक्षम असून, शासनाने या कारखान्याला राज्य हमी (स्टेट गॅरेंटी) द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. श्रीराम कारखान्याच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे, अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह कारखान्याचे सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, श्रीराम हा या तालुक्यातील एक ब्रँड असून तालुक्यातील ऊस उत्पादक बागायतदारांचा कारखान्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारखान्याकडे पाहताना कोणताही राजकीय दृष्टिकोन ठेवू नये, तसेच येथील लोकांचा इतिहास लक्षात घेऊन तालुक्याचे भविष्य धोक्यात आणू नये, असे आग्रही आवाहन त्यांनी केले.

या संदर्भात बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माहिती दिली की, ते या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. कारखान्याच्या कारभारात राजकारण न आणता, या संस्थेपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊनच शासनाने आपली भूमिका निश्चित करावी, अशी स्पष्ट विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. सरकारने संपूर्ण प्रकरणाची गुणवत्ता तपासून निर्णय घ्यावा आणि जर काही सूचना असतील तर त्या आम्हाला सांगाव्यात, आम्ही त्याचे पालन करू, असेही त्यांनी नमूद केले. पूर्वी साखरवाडी कारखाना बंद पडल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांवर जी बिकट परिस्थिती ओढावली होती, त्याची आठवण करून देत श्रीराम आणि साखरवाडीचा कारखाना बंद पाडण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या कारखाने बंद पाडण्याच्या राजकीय षडयंत्राला देवेंद्र फडणवीस यांनी बळी पडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विरोधकांना कोणत्याही परिस्थितीत ‘श्रीराम’ कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचा असून, जर सभासदांनी कारखान्याच्या चाव्या विरोधकांच्या हातात दिल्या, तर ते स्वतःच्या संसाराच्या चाव्या निरा नदीत फेकून देण्यासारखे होईल, असा गंभीर इशारा त्यांनी सर्व सभासदांना दिला. कारखान्याचे भांडवल मजबूत करण्यासाठी सभासदांनी शेअर्सची रक्कम भरण्याच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, एक ते दोन एकर क्षेत्र असलेला गरीब शेतकरीही यासाठी पुढे आला आहे. पूर्वी भागीदार तत्त्वावर कारखाना चालवण्याचे नियोजन असल्याने लहान शेतकऱ्यांवर शेअर्स पूर्ण करण्याचा आग्रह धरला नव्हता. मात्र, आता कारखान्याला प्रत्येक संचालकाने आणि कर्मचाऱ्याने गावागावांत जाऊन शेअर्सची रक्कम गोळा करावी, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांनी ही रक्कम रोख स्वरूपात किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून कर्ज घेऊन जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले. जर सोसायटी पातळीवर ही यंत्रणा गतीने कार्यरत झाली नाही, तर आगामी दोन ते चार दिवसांत स्वतः प्रत्येक गटात जाऊन वैयक्तिक पातळीवर लोकांच्या भेटी घेणार असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

वर्ष १९५७ मध्ये ज्या पद्धतीने श्रीमंत मालोजीराजे यांना सर्वपक्षीय बागायतदारांनी राजकीय विचार बाजूला ठेवून मदत केली होती, त्याच पद्धतीने आताही सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे यांनी या वेळी सांगितले की, शेअर्सची रक्कम भरण्याच्या आवाहनाला सभासदांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!