वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांची भेट; मुधोजी हायस्कूल च्या मिहिका हेंद्रेने साजरा केला अनोखा वाढदिवस

ज्ञानदानाच्या भावनेतून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त; मुधोजी हायस्कूलमध्ये कौतुकास्पद उपक्रम

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. २१ जुलै २०२६) : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कु. मिहिका देवेंद्र हेंद्रे हिने आपल्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी ७ डझन वह्या प्रशालेला भेट देत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

‘आपण समाजाचे काही देणे लागतो’ या भावनेतून मिहिकाने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि ज्ञानप्राप्तीची त्यांची वाटचाल अखंडित राहावी, या उद्देशाने ७ डझन वह्या प्रशालेचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे यांच्याकडे सुपूर्द केल्या.

मिहिका हेंद्रे हिने दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याची परंपरा जपली आहे. मागील वर्षी तिने वाढदिवसानिमित्त सावली देणाऱ्या विविध वनस्पतींची रोपे प्रशालेला भेट दिली होती. यावर्षी गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांची भेट देत तिने शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे म्हणाले, “वाढदिवस हा केवळ उत्सव, केक आणि भेटवस्तूंपुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. कु. मिहिका हेंद्रे आणि तिच्या पालकांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या देऊन समाजाप्रती संवेदनशीलता आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळणार असून, त्यांच्या शिक्षणाला निश्चितच प्रोत्साहन मिळेल.”

Screenshot

“मागील वर्षी मिहिकाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोपांची भेट दिली होती आणि यावर्षी गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांची मदत केली आहे. तिच्या या उपक्रमातून इतर विद्यार्थ्यांनीही प्रेरणा घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत. अशा छोट्या-छोट्या उपक्रमांतूनच समाजात मोठी सकारात्मक चळवळ उभी राहते,” असे आवाहनही प्राचार्य शेडगे यांनी केले.

यावेळी प्राचार्य वसंतराव शेडगे यांच्या हस्ते कु. मिहिका हेंद्रे हिला पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तिचे वडील श्री. देवेंद्र माधवराव हेंद्रे यांच्या हस्ते वह्या प्रशालेकडे सुपूर्द करण्यात आल्या.

Screenshot

यावेळी माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक ए. वाय. ननवरे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, सौ भावना भोईटे, अमोल नाळे इतर मान्यवर उपस्थित होते.

मिहिका हेंद्रे हिच्या या सामाजिक उपक्रमाचे प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!