फलटण : मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्याकडे अवांतर वाचनाची पुस्तके सुपूर्द करताना हिमांशु महाराणा,
समवेत रविंद्र बर्गे.
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २४ जुलै २०२६):- बँक ऑफ बडोदा यांच्या 119 व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण शाखेच्या वतीने महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेच्या ग्रंथालयासाठी सुमारे आठ हजार रुपयांची दर्जेदार पुस्तकांची भेट देण्यात आली.बँकेच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासण्याचा आणि ज्ञानाची आवड वाढविण्याचा विधायक प्रयत्न करण्यात आला.
यावेळी बँक ऑफ बडोदा फलटण शाखेचे व्यवस्थापक हिमांशू महाराणा, बँक अधिकारी अजित चव्हाण, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे,मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना व्यवस्थापक हिमांशू महाराणा म्हणाले, “विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी.प्रत्येक पुस्तकात ज्ञानाचा खजिना दडलेला असतो.जी पुस्तके अथवा पुस्तकांतील पाने वाचनीय वाटतील,त्यांचे नियमित वाचन करावे. त्यातून वाचनाची गोडी निर्माण होईल, विचारशक्ती विकसित होईल,भाषेवर प्रभुत्व मिळेल आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होईल.पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचनाची सवय विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोलाची ठरते.ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून स्वतःला ज्ञानसमृद्ध बनवावे.”
रविंद्र बर्गे म्हणाले,”आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा ज्ञानाचे साधन असला
तरी त्याचा अतिरेकी वापर टाळणे गरजेचे आहे.त्यामुळे मुलांनी रिकामा वेळ फक्त मोबाईलवर घालवण्याऐवजी पुस्तक वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे.पुस्तके माणसाला विचारांची दिशा, संस्कार,ज्ञान आणि जीवनमूल्ये देतात.त्यामुळे मुलांनी पुस्तकाची मैत्री करावी.
प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी बँक ऑफ बडोदाच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल कौतुक करून आभार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनीही नव्या पुस्तकांविषयी उत्सुकता व्यक्त करत ग्रंथालयाचा नियमित वापर करण्याचा यावेळी संकल्प केला. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.किशोर पवार यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

