फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०६ ऑक्टोबर २०२६):-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे आयोजित नेहरू राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणच्या मुलींच्या हॉकी संघाने प्रथम क्रमांक पटकावून दणदणीत विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे दिल्ली येथे होणाऱ्या नेहरू राष्ट्रीय चषक हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याचा मान सलग दुसऱ्या वर्षी मुधोजी हायस्कूलच्या संघाने मिळवला आहे. सातारा जिल्ह्यातील सलग दोन वर्षे राष्ट्रीय नेहरू चषक स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणारा हा पहिलाच मुलींचा हॉकी संघ ठरला असून, या संघाने मागील वर्षीही दिल्ली येथे महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते.

कोपरगाव येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, मुंबई, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि क्रीडा प्रबोधिनी अशा राज्यातील नऊ विभागांच्या मातब्बर संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत राष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. गायत्री खरात, कु. अनघा केंजळे, कु. सिद्धी केंजळे, कु. वेदिका वाघमोरे, कु. श्रद्धा यादव, कु. श्रावणी राहिगुडे व कु. साक्षी चव्हाण यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर गोल डागले. मधल्या फळीत कु. मानसी पवार, कु. गौरी हिरनवाळे, कु. समृद्धी बनकर, कु. नंदिनी शिंदे व कु. श्रावणी ननावरे यांनी भक्कम खेळ केला, तर बचाव फळीत राष्ट्रीय खेळाडू कु. अनुष्का केंजळे व कु. मृण्मयी घोरपडे यांनी प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण मोडून काढले. गोलकीपर कु. आरोही पाटील हिनेही गोलपोस्टसमोर अत्यंत चमकदार कामगिरी बजावली.हा संघ येत्या १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.


या यशस्वी संघाला ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूलचे हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ आणि संघ व्यवस्थापक कु. धनश्री क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शारीरिक तंदुरुस्ती प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश पवार व विनय नेरकर यांचे मार्गदर्शन लाभले असून, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक बी. बी. खुरंगे व ज्येष्ठ हॉकी खेळाडू सुजित निंबाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फ.ए.सो.च्या नियामक मंडळ सदस्य ,फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजीचे प्राचार्य वसंतराव शेडगे, माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय लोंढे, सौ. पूजा पाटील, स्कूल कमिटीचे पदाधिकारी, ‘द हॉकी सातारा’ संघटनेचे पदाधिकारी व फलटणमधील क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

