मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने ज्ञान आकलन क्षमता वाढते- जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि. २४ जुलै २०२६):-
मातृभाषेतून शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे ज्ञान आकलनाची क्षमता वाढते आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर तहसीलदार सर्वसाधारण चंद्रकांत शितोळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्याला विविध परीक्षांना सामोरे जावे लागते, असे सांगून श्री. गव्हाड म्हणाले की, या परीक्षांना आत्मविश्वासाने तोंड देण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण मोलाचे ठरते. शिक्षकांनीही वर्गात विचारमंथन करताना मातृभाषेचाच अधिक वापर केला पाहिजे.
यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे म्हणाले, जे विद्यार्थी मातृभाषेतून शिक्षण घेतात ते कोणत्याही स्पर्धेत उत्तम प्रकारे टिकून राहतात हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी विविध साहित्य व ग्रंथांचे अवांतर वाचन केले पाहिजे. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतून चर्चासत्रांचे आयोजन करावे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखाधिकारी शीतल करंजेकर यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!