फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ०७ सप्टेंबर २०२६): – फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन आणि आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. के. शेडगे होते, तर उपप्राचार्य एस. एस. माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार व उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवून समाज घडवण्याचे कार्य करावे, असे मत मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केले. तसेच राजे उमाजी नाईक यांच्या शौर्याची माहिती देत विद्यार्थ्यांनी देशप्रेम व स्वाभिमानाची प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान सर्व शिक्षकांना पेन देऊन सन्मानित करण्यात आले.

शिक्षक दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. गीत गायन स्पर्धेत आर्या साळुंखे (१२ वी C), भाग्यश्री सोनवलकर (११ वी C) व साची जगताप (११ वी D) यांनी अनुक्रमे यश मिळवले. तर मेहंदी स्पर्धेत सिद्धी वानखेडे (११ वी A), सिद्धी ओतारी (११ वी B) व श्रावणी वावरे (११ वी B) यांनी पारितोषिके पटकावली.
या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन, सूत्रसंचालन व सादरीकरण विद्यार्थ्यांनी स्वतः हाताळल्याने त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळाला. साक्षी चव्हाण हिने प्रास्ताविक केले, भार्गवी बडवे हिने सूत्रसंचालन केले आणि तस्मिया बागवान हिने आभार मानले. आरती परदेशी, गार्गी देवरे व गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


