फलटण टुडे वृत्तसेवा ( साखरवाडी , दि २८ ऑगस्ट २०२६):-गुरुवार ,दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज किमान कौशल्य विभाग साखरवाडी येथे साखरवाडी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त प्रशालेस भेट दिली. प्रशालेचे प्राचार्य गोपाळराव जाधव सर यांनी साखरवाडी व परिसरातील मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमास उपस्थित असणारे सेवानिवृत्त शिक्षक हरिदास सावंत यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून समाजात सर्वधर्मसमभावाची भावना वृद्धिंगत करावी असे आवाहन केले. याप्रसंगी साखरवाडी व परिसरातील मुस्लिम बांधवांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच प्रशालेचे वरिष्ठ लिपिक राहुल बोबडे यांचे फलटण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशालीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक प्रतिनिधी महेश बावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र टिळेकर यांनी केले.



