राष्ट्रीय खो-खो खेळाडू तथा क्रीडा मार्गदर्शक श्याम पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रशांत उर्फ श्याम पवार

फलटण टुडे वृत्तसेवा (/सांगली दि ०७ सप्टेंबर २०२६):- राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक तथा खो-खोचे राष्ट्रीय खेळाडू प्रशांत उर्फ श्याम पवार (वय ५९) यांचे सांगली येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. मूळचे फलटण येथील असलेल्या पवार यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एक उमदे व्यक्तिमत्त्व गमावले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात पवार यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रशांत उर्फ श्याम पवार यांनी एक उत्कृष्ट खो-खो खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्यांनी क्रीडा मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून भरीव योगदान दिले. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात काम करताना त्यांनी ग्रामीण भागातील अनेक होतकरू खेळाडूंना मार्गदर्शन करून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर घडवले. शिस्त, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक खेळासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
त्यांच्या हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे क्रीडा क्षेत्रातील सहकारी, खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना होती. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!