मुधोजी हायस्कूलच्या हॉकी संघाची नेहरू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; विभागीय स्पर्धेत अव्वल स्थान….

फलटण टुडे वृत्तसेवा (कोल्हापूर, दि २७ सप्टेंबर २०२६): –
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आयोजित नेहरू विभागस्तरीय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून नेहरू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे. या संघाची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत याच संघाने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले होते. 
आगामी राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूल, कोळपेवाडी (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) या ठिकाणी पार पडणार आहेत. कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर मनपा, सांगली जिल्हा, सांगली मनपा, इचलकरंजी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. 

उपांत्य व अंतिम सामन्यात एकतर्फी विजय:
स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुधोजी हायस्कूलच्या संघाने सांगली मनपा संघाचा ६-० अशा दणदणीत गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर रंगलेल्या अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाचा ४-० अशा गोलफरकाने धुव्वा उडवत मुधोजीच्या संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. 

खेळाडूंची चमकदार कामगिरी:
या स्पर्धेत राष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. गायत्री खरात, कु. अनघा केंजळे, कु. सिद्धी केंजळे, कु. वेदिका वाघमोरे, कु. श्रद्धा यादव, कु. श्रावणी राहिगुडे व कु. साक्षी चव्हाण यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघावर गोल डागले. मधल्या फळीत कु. मानसी पवार, कु. गौरी हिरणवाळे, कु. समृद्धी बनकर, कु. नंदिनी शिंदे व कु. श्रावणी ननावरे यांनी उत्तम कामगिरी बजावली. बचाव फळीत राष्ट्रीय खेळाडू कु. अनुष्का केंजळे आणि कु. मृण्मयी घोरपडे यांनी प्रतिस्पर्ध्यांचे चाललेले सर्व हल्ले परतवून लावले, तर गोलकीपर कु. आरोही पाटील हिनेही उत्कृष्ट रक्षण केले. 

मार्गदर्शन आणि सहकार्य:
विजेत्या संघाला ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूलचे हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ आणि संघ व्यवस्थापक कु. धनश्री क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय फिजिकल फिटनेस ट्रेनर ऋषिकेश पवार, विनय नेरकर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक बी. बी. खुरंगे आणि ज्येष्ठ हॉकी खेळाडू सुजित निंबाळकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. 

मान्यवरांकडून अभिनंदन:
या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्यूकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य , प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय लोंढे पाटील, सौ. पूजा पाटील, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ‘द हॉकी सातारा’ संघटनेचे पदाधिकारी आणि फलटणमधील क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!