फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ३ ऑक्टोबर २०२६):-
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ व हरवलेल्या तब्बल ७१ मोबाईल फोनचा शोध घेण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. शोध घेण्यात आलेल्या या मोबाईलची एकूण बाजारभावानुसार अंदाजे किंमत १२ लाख ८० हजार रुपये आहे. सी.ई.आय.आर. (CEIR) पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल गहाळ झाल्याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेत सी.ई.आय.आर. पोर्टलद्वारे विशेष शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दाखल तक्रारींची माहिती पोर्टलवर अपलोड करून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.

तपासादरम्यान हे मोबाईल सातारा जिल्ह्याबाहेर तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या परराज्यांत वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित मोबाईल वापरकर्त्यांशी संपर्क साधून कायदेशीर बाबी समजावून सांगत ते मोबाईल परत मिळवले. काही मोबाईल प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आले, तर काही कूरियरद्वारे मागवण्यात आले. लांबच्या तक्रारदारांना पोलीस ठाण्यात न येता त्यांचे मोबाईल थेट कूरियरद्वारे घरपोच पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२६ अखेर पोलिसांनी एकूण ७१ मोबाईल हस्तगत करून तक्रारदारांना मोठा दिलासा दिला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, सी.ई.आय.आर. पोर्टलचे काम पाहणारे श्रीनाथ कदम, तसेच पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे आणि हनुमंत दडस यांनी केली आहे.


