श्रीराम साखर कारखान्याचे रणशिंग फुंकणार! ७० व्या गळीत हंगामाचा १२ ऑक्टोबरला दिमाखदार शुभारंभ….

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ११ ऑक्टोबर २०२६):-
रामनगर, फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या सन २०२६-२७ च्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आणि कारखान्याचा ७० वा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कारखान्याकडील सर्व सभासद, ऊस उत्पादक, व्यापारी, कंत्राटदार, खातेप्रमुख तसेच कामगार, कर्मचारी व हितचिंतक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
या कारखान्याचा ७० वा गळीत हंगाम शुभारंभ व बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.


या कार्यक्रमास फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, हुपरीच्या सी.ए. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जी. जोशी, अध्यक्ष बाबासो चौगुले आणि फलटण दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा हा ७० वा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब पंढरीनाथ शेंडे, व्हाइस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा संचालक श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे.
तरी या महत्त्वाच्या कार्यक्रमास सर्व सभासद, ऊस उत्पादक, तोडणी-वाहतूक कंत्राटदार, कामगार, कर्मचारी व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!