फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ११ ऑक्टोबर २०२६): –
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बरड येथे शनिवारी रात्री महामार्ग ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलिसांच्या वतीने रविवारी परिसरात तातडीने रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी-पंढरपूर महामार्गावर मौजे बरड हद्दीत दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महामार्ग ओलांडत असलेल्या एका व्यक्तीस भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेची दखल घेत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत शिस्त व जागरूकता निर्माण करण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेअंतर्गत महामार्ग ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी भुयारी मार्गाचा (बोगदा) आणि सर्व्हिस रोडचा वापर करावा, असे आवाहन करणारे बॅनर परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आले. तसेच नागरिकांना रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

नागरिकांनी महामार्ग ओलांडताना जीव धोक्यात घालून घाईगडबड करू नये, उपलब्ध असलेल्या भुयारी मार्ग व सुरक्षित पर्यायांचाच वापर करावा आणि स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी केले आहे.

