फलटण टुडे वृत्तसेवा ( दिल्ली दि १३ ऑक्टोबर २०२६):-
दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या ६३ व्या राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण (महाराष्ट्र) च्या संघाने विजयी घोडदौड सुरू केली आहे. सलामीच्या पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करत फलटणच्या संघाने दिल्ली संघाचा ५-० असा दणदणीत पराभव केला आणि स्पर्धेत दणक्यात आगेकूच केली.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच मुधोजी हायस्कूलच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया करत दिल्लीच्या संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. उत्कृष्ट सांघिक खेळ, अचूक पासिंग आणि भक्कम बचावफळीच्या जोरावर फलटणच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करू दिला नाही. पूर्ण वेळेत ५ गोल डागत संघाने एकतर्फी विजय मिळवला.

या घवघवीत विजयाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, क्रीडा समितीचे चेअरमन, प्राचार्य, शिक्षक आणि फलटणकर क्रीडाप्रेमींकडून विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शक प्रशिक्षक-शिक्षकांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी सामन्यांमध्येही मुधोजीचा संघ अशीच विजयी घोडदौड कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

