फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ३० जुलै २०२६):- : मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्ञान, संस्कार आणि गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. वाकुडकर एस्. पी. यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर इ. ११ वी व इ. १२ वीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करत, प्राचीन काळापासून अखंड सुरू असलेल्या गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूंचे अनमोल स्थान प्रभावी शब्दांत मांडले.
याप्रसंगी प्राचार्य श्री. शेडगे व्ही. के. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संगणक अनेक गोष्टी शिकवू शकतो; परंतु विद्यार्थ्यांच्या भावना, क्षमता, संस्कार आणि व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख करून त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य केवळ गुरूच करू शकतात. जीवनात यश, चारित्र्य आणि मूल्यांची जपणूक करण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनावर निष्ठा आणि श्रद्धा ठेवून सातत्याने वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने उपप्राचार्य श्री. माने एस्. एस्. यांनी शब्दरूपी संदेशाद्वारे सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत कार्यक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नाईक निंबाळकर डी.आर्. यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. नार्वेकर आर्. जे. यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

