फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि १४ ऑक्टोबर २०२६):-
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा आणि माय भारत (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ‘युवा महोत्सव २०२६-२७’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या महोत्सवासाठी “नशामुक्त युवा फॉर विकसित भारत” ही विशेष संकल्पना (थीम) निश्चित करण्यात आली आहे. हा महोत्सव शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सैनिक स्कूल, सातारा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये पार पडणार आहे.
युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींसाठी या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरवले जाणार आहे. यामध्ये समूह लोकनृत्य स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७,००० रुपये, द्वितीय ५,००० रुपये व तृतीय ३,००० रुपये ठेवण्यात आले आहे. समूह लोकगीत स्पर्धेसाठी प्रथम ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये व तृतीय २,००० रुपये दिले जाणार आहेत. चित्रकला आणि कविता लेखन स्पर्धांसाठी अनुक्रमे प्रथम ३,००० रुपये, द्वितीय २,००० रुपये व तृतीय १,००० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय पथनाट्य स्पर्धेच्या पारितोषिकांची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे (https://forms.gle/3ZZM92k9TnhK7X599) आपली नोंदणी करायची आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती जयश्री देवकर (मो. ९२०९३१४६४९) किंवा क्रीडा अधिकारी श्रीमती स्नेहल शेळके (मो. ८७८८२३३६०९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील तरुण-तरुणींनी या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व माय भारत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७: सातारा येथे ३० ऑक्टोबरला आयोजन; ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्पनेवर विविध स्पर्धांचे आयोजन
