सेवा संकल्प अभियानांतर्गत फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम; दर महिन्याला तीन वेळा शिबिराचे आयोजन
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.१७ ऑक्टोबर २०२६):- सेवा संकल्प अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण यांच्या वतीने तरडगाव येथे प्रथमच वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे तरडगावसह साखरवाडी आणि लोणंद परिसरातील नागरिकांना वाहनचालक परवान्याशी संबंधित प्रक्रिया स्थानिक पातळीवर पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
फलटण व माण तालुक्यातील नागरिकांची होणारी गैरसोय कमी व्हावी आणि वाहनचालक परवान्याची चाचणी देण्यासाठी दूरवर जावे लागू नये यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या अधिपत्याखाली तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांच्या प्रयत्नांतून आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. तरडगाव येथील पालखी विश्रामस्थळावर हे शिबिर सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी दर महिन्याला तीन वेळा शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत होणार आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी तरडगावचे सरपंच तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील जितेंद्र लोंढे आणि सौ. इंगळे यांनी सहकार्य केले. स्थानिक पातळीवर शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
